लातूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत लातूर जिल्हा पोलीस दलात भरती झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रामदास बलभीम नाडे यांना पोलीस महासंचालकांतर्फे दिले जाणारे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. मूळचे लातूर तालुक्यातील मुरुड येथील सुपुत्र रामदास नाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १९९२ मध्ये पोलीस दलात नोकरी स्वीकारली. व्हाॅलिबाॅलचे ते खेळाडू होत. त्यांनी आतापर्यंत पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
जिल्ह्यातील भादा, वाढवणा, गांधी चौक, निलंगा, स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असताना, खून, दरोडा, चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत केली आहे.
पोलीस दलात सतत दहा वर्षे राज्यस्तरावरील व एकवेळ १९९८ मध्ये हैदराबाद येथील चौदाव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत व्हाॅलिबाॅलमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाला यश मिळवून दिले होते.