अनैतिक संबंधातून खून, दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:28+5:302021-03-21T04:18:28+5:30
लातूर तालुक्यातील सावरगाव शिवारातील महेश शिंदे यांच्या उसाच्या फडात मृतदेह असल्याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. त्यावरून मुरुड ठाण्याचे सपोनि ...

अनैतिक संबंधातून खून, दोन आरोपींना अटक
लातूर तालुक्यातील सावरगाव शिवारातील महेश शिंदे यांच्या उसाच्या फडात मृतदेह असल्याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. त्यावरून मुरुड ठाण्याचे सपोनि ढोणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सदर मृताच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे दिसून आले. पोलिसांनी तपास सुरू केला असता मृत हा औसा तालुक्यातील कवठा (केज) येथील भागवत रंगराव घुटे (५२) असल्याचे निष्पन्न झाले. तद्नंतर मृत भागवत घुटे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याच रागातून महिलेची दोन मुले, महिलेचा भाऊ व अन्य एकाने कट रचून १६ मार्च रोजी सायंकाळी भागवत घुटे यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची तक्रार मृताचा मुलगा किशोर घुटे यांनी मुरुड पोलिसात दिली. त्यावरून कलम ३०२, २०१, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी तपास अधिकारी सपोनि ढोणे यांना तपासासंदर्भाने सूचना केल्या. सपोनि ढोणे व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी सतीश केरबा कांबळे (रा. सावरगाव), कैलास दादाराव हिंगे (रा. कवठा) यांना अटक केली तसेच अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीकडून मृताची दुचाकी जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील फरार आरोपी विकास हिंगे याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ढोणे, पोउपनि सुर्वे, पोना बहादूरअली सय्यद, रतन शेख, सुधीर सालुंके, महेश पवार यांनी केली.