रस्ता दुभाजकातील वृक्षांना जगविण्यासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:28+5:302021-03-13T04:35:28+5:30

उदगीर : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वृक्षांना जगविण्याबरोबरच हरित, स्वच्छ व सुंदर उदगीर शहर निर्माण करण्यासाठी पालिकेने पुढाकार ...

Municipal struggle to keep the trees in the road divider alive | रस्ता दुभाजकातील वृक्षांना जगविण्यासाठी पालिकेची धडपड

रस्ता दुभाजकातील वृक्षांना जगविण्यासाठी पालिकेची धडपड

उदगीर : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वृक्षांना जगविण्याबरोबरच हरित, स्वच्छ व सुंदर उदगीर शहर निर्माण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत देगलूर रोड व नळेगाव रोडवरील रस्ता दुभाजकातील वृक्षांना पाण्यासाठी वापरलेल्या सलाइनच्या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. तसेच या दुभाजकातील वृक्षांच्या बाजूने पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यास मदत होत आहे.

यंदा फेब्रुवारीत कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. दरम्यान, पावसाळ्यात नगरपालिकेकडून शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. सदरील वृक्षांनी चांगले बाळसे धरले आहे. मात्र या वर्षी आतापासूनच कडक उन्हाळा जाणवत असल्याने हे वृक्ष जगतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, पालिकेच्या स्वच्छता विभागाने नामी शक्कल लढवून या वृक्षांना जमविण्याचा संकल्प केला. या वृक्षांना ठिबकने पाणी मिळाल्यास जमिनीत कायम ओलावा टिकून राहील व पाण्याचीही बचत होईल. म्हणून या कर्मचाऱ्यांनी सलाइन बाटल्यांचा वापर करण्याचे ठरविले. पाणी बचत होऊन या वृक्षांच्या मुळांना २४ तास पाणी मिळणार आहे. तसेच कायम ओलावा असल्याने सदरील वृक्ष टवटवीत दिसत आहेत. तसेच दुभाजकातील या वृक्षांच्या भोवती पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. सदरील बाटलीत रंगीबेरंगी पाणी भरून जमिनीत थोडे रोवले आहे. या बाटल्यांमुळे रस्ता दुभाजकाचे सौंदर्य वाढले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे. नळेगाव रस्ता हा सामाजिक बांधकाम विभागांतर्गत येतो. तरीही नगरपालिकेने या दुभाजकात वृक्षारोपण करून ती जगली पाहिजेत म्हणून पुढाकार घेतला आहे. शहराचा विकास व वैभव कायम राहावा तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपला हातभार लागावा, म्हणून नगरपालिका माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुढाकार घेत आहे.

सर्व रोपे जगविण्यावर भर...

नगर परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आम्ही हरित, स्वच्छ व सुंदर उदगीरचा संकल्प केला आहे. या वर्षी जी वृक्ष लागवड झाली, ते सर्व वृक्ष जगविण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही रस्ता दुभाजकातील झाडे, वेली जगविण्यासाठी धडपड करीत आहोत. तसेच शहराच्या वैभवात व सौंदर्यात भर पडावी, म्हणून आम्ही पुढाकार घेत आहोत. नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे, असे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सांगितले.

Web Title: Municipal struggle to keep the trees in the road divider alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.