महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचारी निभावतात सहायक ‘फायरमन’ची भूमिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:13+5:302021-03-01T04:22:13+5:30
लातूर : आकृतिबंधानुसार ९६ पदे अग्निशमन विभागाला मंजूर असली तरी सद्य:स्थितीत या विभागात केवळ ४३ कर्मचारी सेवा देत आहेत. ...

महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचारी निभावतात सहायक ‘फायरमन’ची भूमिका !
लातूर : आकृतिबंधानुसार ९६ पदे अग्निशमन विभागाला मंजूर असली तरी सद्य:स्थितीत या विभागात केवळ ४३ कर्मचारी सेवा देत आहेत. यातील २१ कंत्राटी कर्मचारी वगळता कायमस्वरूपी २२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ७ कर्मचाऱ्यांनीच राज्य अग्निशमन केंद्र मुंबई येथे प्रशिक्षण घेतले आहे. उर्वरित कर्मचारी अनुभवावर आग आटोक्यात आणण्याचे काम करतात.
अग्निशमन दलामध्ये केवळ पाच कर्मचारी आहेत. यातील दोन कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सफाई विभागातून अग्निशमन दलाला १७ कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यातील तीन वाहनचालक असून, उर्वरित १४ कर्मचारी फायरमनचे मदतनीस म्हणून सेवा देत आहेत. यातील तिघांनी राज्य अग्निशमन केंद्र मुंबई येथून प्रशिक्षण घेतले आहे, तर अग्निशमन विभागातील पाचपैकी दोघेच प्रशिक्षित आहेत. सफाई विभागातील १७ आणि अग्निशमन दलातील ५ असे एकूण २२ कर्मचारी कायमस्वरूपी आहेत.
कायमस्वरूपी असलेल्या २२ कर्मचाऱ्यांपैकी ७ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. १५ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. आकृती बंधानुसार मनुष्यबळ मिळावे, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. सध्या अग्निशमन दलात ४३ कर्मचारी आहेत. यात कंत्राटी २१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या बळावर आगीसारख्या घटना आटोक्यात आणल्या जातात. तीन शिफ्टमध्ये विभागाचे काम चालते. कमी मनुष्यबळात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे.
- जाफर शेख, अग्निशमन अधिकारी, लातूर
आकृतिबंधानुसार ९६ पदे अग्निशमन दलासाठी मंजूर आहेत; परंतु अद्याप त्याची भरती नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी १, अग्निशमन अधिकारी ३, उपअग्निशमन अधिकारी ६, फायरमन १२, लिडिंग फायरमन १२, वाहनचालक, आदी ९६ पदांचा आकृतिबंध आहे; परंतु अद्याप भरती केली नसल्यामुळे अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा कारभार सुरू आहे.