लातूर : कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले होते. तब्बल २११ रुग्ण या आजाराचे आढळले असून, यातील ११५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर उपचारादरम्यान १८ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत या आजाराचे ७८ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ५१ रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल आहेत, तर २७ रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयासह २३ हॉस्पिटलमध्ये सध्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांचा उच्चांक झाल्यानंतर जे रुग्ण गंभीर होऊन बरे झाले, अशा काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे निदान झाले. त्यात यशस्वी उपचारानंतर ११५ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. म्युकरमायकोसिसमुळे मयत झालेल्या १८ पैकी १२ रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते, तर ६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
चेहऱ्यावर सूज येणे, दात ढिले होऊन दुखणे, खोकला, ताप येणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, नाकातून पाणी गळणे, चेहऱ्याचा एक भाग सुजणे किंवा दुखणे आदी लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे, त्यांनी अशी लक्षणे दिसल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय, पोस्ट कोविड ओपीडीमध्ये किमान १५ दिवसाला जाऊन दाखवून तपासणी करून घ्यावी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये तपासणी करून घेता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
६ जणांचा एक डोळा निकामी
कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झालेल्या सहा रुग्णांचा एक डोळा निकामी झाला आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असून, यातील काही जणांना रुग्णालयातून सुटीही मिळाली आहे.
कोरोनानंतर ज्यांना गाल सुजणे, डोळ्यातून पाणी गळणे, दात हलणे, ताप, खोकला आदी लक्षणे आहेत, त्यांनी तत्काळ डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.
सौम्य लक्षणे असतानाच डॉक्टरांना दाखविल्यास योग्य वेळेत उपचार होऊन रुग्ण बरे होतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
औषधांची कमतरता कायम
म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी असणाऱ्या औषधांचा सध्याही तुटवडा आहे. ॲफ्टोटेरेसिन-बी तसेच काही टॅब्लेटचीही कमतरता आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून रुग्णसंख्येनुसार तसेच ज्या रुग्णांना गरज आहे, अशा रुग्णांसाठी सदर औषधांचा पुरवठा केला जात आहे.
अद्याप मुबलक प्रमाणात या आजाराची औषधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय आहे. सध्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून, ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना होऊ नये म्हणून नियमित मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे ही त्रिसूत्री आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग खंडित होऊ शकतो. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत असल्यास तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. विनोद कंदाकुरे, तज्ज्ञ
ही घ्या काळजी
ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना गालदुखी, डोकेदुखी, दातदुखी व डोळेदुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर आजार लवकर बरा होतो.