अहमदपूर : तालुक्यात पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. यंदाच्या मोसमात जूनमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. एकाच दिवशी ६० मिमी पाऊस पडला. शिरूर ताजबंद मंडळात अतिवृष्टी झाली असून, पहिल्याच पावसात नाले भरून वाहात आहेत. त्यामुळे खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
अहमदपूर तालुक्याची जूनची सरासरी ६२.३ मिमी आहे. यंदाच्या मोसमात सरासरी १०८.४ मिमी पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान ७७४.४ मिमी पाऊस पडतो. सध्या जूनच्या सरासरीच्या १४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीस लागले आहेत.
रविवारच्या पावसाने लवकरच पेरण्यांना आणखीन वेग येणार आहे. दरम्यान, पावसामुळे नाले भरून वाहात आहेत. रविवारी एकाच दिवसात सरासरी ६०.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंडलनिहाय पाऊस...
तालुक्यात मंडलनिहाय पाऊस आणि कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये : अहमदपूर ५५ (१६५), किनगाव ३४ (१०७), अंधोरी ४६ (१२०), खंडाळी ७१ (१३८), शिरूर ताजबंद १०१ (२७१), हडोळती ५५ (१४७) असा पाऊस झाला आहे.
तलाव ४० टक्के भरला...
शिरूर ताजबंदमध्ये रविवारी १०१ मिमी पाऊस झाला. तालुक्यात सर्वाधिक २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सरासरीच्या ३५ टक्के पाऊस झाला. नाले ओसंडून वाहात आहेत. शिरूर ताजबंदजवळील साठवण तलावात एकाच दिवसात ४० टक्के जलसाठा झाल्याचे तलाठी श्याम कुलकर्णी यांनी सांगितले.
अतिवृष्टीने नुकसान नाही...
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच शिरूर ताजबंद येथे अतिवृष्टी झाली आहे. मात्र, कुठलीही हानी झाली नाही. केवळ नाले भरून वाहात आहेत. एक साठवण तलाव ४० टक्के भरला असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.