MPSC Result: अंगणवाडी मदतनीसचा मुलगा बनला पीएसआय; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
By संदीप शिंदे | Updated: July 7, 2023 18:29 IST2023-07-07T18:27:35+5:302023-07-07T18:29:20+5:30
निवृत्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती.

MPSC Result: अंगणवाडी मदतनीसचा मुलगा बनला पीएसआय; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
औराद शहाजानी : वडील गावातील मंदिरात पुजारी तर आई अंगणवाडी मतदनीस. त्यांचे कष्ट आणि मुलांच्या शिक्षणासाठी असलेली धडपड बघून मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेत यश मिळवित पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून आई-वडीलांच्या कष्टाचे चीज करणाऱ्या मुलाचा भव्य सत्कार केला.
निलंगा तालुक्यातील शेळगी येथील निवृत्ती माने यांची आई छायाबाई या अंगणवाडीत मदतनीस तर वडील गावातील मंदिरात पुजारी आहेत. लहानपणापासून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या निवृत्ती याने प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण औराद येथील महाराष्ट्र विद्यालय आणि उच्च शिक्षण वसंतराव पाटील विद्यालय आणि मुक्त विद्यापीठातून पुर्ण केले. त्यानंतर एमपीएससीची तयारी करीत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्यामुळे गावात आगमण होताच ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषद शाळा व शहाजानी येथील वसंतराव पाटील विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक उपस्थित हाेते.
दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी...
निवृत्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. पहिल्या प्रयत्नात तीन गुणांनी पदाला हूलकावणी मिळाली. मात्र, निराश न होता तयारी सुरुच ठेवत निवृत्तीने दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.