किनगाव हे बाजारपेठेचे गाव असल्याने परिसरातील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. त्यामुळे नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायतला अडचणी येत आहेत. त्यामुळे नगर पंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी किनगावची २०२२ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, अकृषिक रोजगारची टक्केवारी, ग्रामपंचायतचा संपत असलेला कार्यकाळ, प्रस्तावित नगर पंचायत स्थापन करण्यासाठी निर्गमित करावयाच्या उद्घोषणेची अनुसूची अ व अनुसूची ब चे इंग्रजी तसेच मराठी भाषेतील प्रारूप, प्रस्तावित नगर पंचायत स्थापनेच्या अनुषंगाने हद्द दर्शविणारा नकाशा, नगर पंचायत स्थापन करण्यास हरकत नसल्याबाबतचा ग्रामपंचायत ठराव मागण्यात आला आहे. हे सर्व अभिप्राय प्राप्त होताच शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
आमदार बाबासाहेब पाटील यांनी किनगाव ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात यावे, यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन दिले असून त्याचा पाठपुरवठा केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार किनगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती ग्रामविकास अधिकारी व सरपंचांकडून घेण्यात येत आहे. नगर पंचायतीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून १५ ते २० दिवसात शासनाकडे पाठविला जाईल.
- अजयकुमार अदंलवाड, गटविकास अधिकारी.
किनगाव ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होणे हे नागरिकांच्या फायद्याचे असून नागरिकांना अधिक सुविधा मिळतील. नगर पंचायत व्हावी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्यात येईल.
- किशोर मुंडे, सरपंच
या गावामध्ये मोठी बाजारपेठ आहे. तसेच आजूबाजूच्या वाडी-खेड्याचे लोक येथे व्यापारासाठी येतात आणि या लोकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.