चाकूर : तालुक्यातील २६ गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विद्युत पुरवठा खंडीत केला.वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी कोणतीही रितसर नोटीस संबंधीत शेतकऱ्यांना दिली नाही. या प्रश्नी तहसील कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.
मनसेने शेतकऱ्यांची विजतोडणी व पीकविमा वाटप यावर जाब विचारण्यासाठी महावितरण अभियंता आणि कृषी अधिकारी यांना तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्यासमोर तहसील कार्यालयात बोलाविले होते. मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. नियमाने वीज तोडणी करण्याअगोदर पंधरा दिवस अगोदर संबंधित शेतकरी व वीज ग्राहकास नोटीस देणे हे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायदा मोडून महादादागिरी करत गावची गावे अंधारात ढकलत आहेत.असे डॉ.भिकाणे यांनी सांगितले.त्यामुळे चोरीच्या प्रमाण वाढ झालेली आहे.
यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना विजतोडणी झाल्यामुळे पाणी कमी पडून पिके कोलमडते आहेत.त्यातच अनेक गावात ट्रान्सफॉर्मर जाळले आहे.ती सुद्धा ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक असताना महावितरण वेळेवर देत नाही.तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, धोकादायकरित्या जमिनीवर व उघडे पडलेली आहेत. तिथे महावितरण साधे मेंटेनन्स करत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा जीव जात आहे.ऊसाची शेते जळत आहेत.तसेच पीकविमा का जाहीर झाला नाही याचा ही जाब कृषि अधिकाऱ्यांना व विमाकंपनी अधिकाऱ्याला मनसेने विचारत तो लवकरात लवकर जाहीर नाही झाला तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा डॉ.भिकाणे यांनी यावेळी दिला. तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर मनसेने ठिय्या आंदोलन थांबवले.
जर महावितरणने परत विजतोडणी केली. तर त्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड काढू असा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष डॉ.भिकाणे यांनी अभियंत्याला दिला. महावितरण यानंतर सूडबुद्धीने नाही तर सद्बुद्धीने वागावे असा सल्ला दिला. तसेच कालावधी उलटून गेला तरी पीकविमा का वाटप न होण्याचे कारण पीकविमा कंपनीचे खोटे पंचनामे असून कंपनीने शासनाने केलेले पंचनामे गृहीत धरून त्वरित पीकविमा वाटप करावे अशी मागणी केली. यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडीराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते. ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे.तेथे लवकर ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. वीजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी यावेळी सांगितले.