जिल्ह्यात आतापर्यंत ३७ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. औषधींचा साठा उपलब्ध आहे. जनआरोग्य योजनेत उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आतापर्यंत ७ जणांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.- डॉ.एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक
माझे वडील कोरोनातून बरे झाले आणि त्यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. कोरोना काळात लाख-दोन लाखांचा खर्च झाला. उसनवारी करून पैशांची तडजोड केली होती. आता म्युकरमायकोसिसचा आजार झाला असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. जनआरोग्य योजनेत केवळ दीड लाखांची मदत तुटपुंजी आहे. - रुग्ण नातेवाईक
कोरोनातून बरे झाल्यानंतर अचानक बुरशीचा आजार झाला. त्यामुळे कुटुंबात भीती पसरली आहे. उपचारासाठी खर्चही करत आहोत. मात्र शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. केवळ दीड लाख रुपयांत उपचार होणे अशक्य आहे. - रुग्ण नातेवाईक
जिल्ह्यात न्यायिक पद्धतीने औषधींचे वितरण
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने न्यायिक पद्धतीने ॲम्फोटेरेसिन औषधींचे वितरण केले जाणार आहे. औषध वितरणासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, काही रुग्णांना औषधींसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शासनाने म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णांना जनआरोग्य योजनेअंतर्गत जाहीर केलेली दीड लाखांची मदत वाढवावी, अशी मागणीही रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे.