उदगीरच्या माल धक्क्यातून रेल्वेला लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:46+5:302021-04-13T04:18:46+5:30
उदगीर : येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरून २४ बोगीतून भालकेश्वर साखर कारखान्याची ३१ हजार बॅग साखर सोमवारी मुंबईला रवाना झाली आहे. ...

उदगीरच्या माल धक्क्यातून रेल्वेला लाखोंचे उत्पन्न
उदगीर : येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरून २४ बोगीतून भालकेश्वर साखर कारखान्याची ३१ हजार बॅग साखर सोमवारी मुंबईला रवाना झाली आहे. या मालवाहतुकीच्या भाड्यापोटी रेल्वेला १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यापूर्वी येथून दोनदा सोयाबीनची वाहतूक झाली होती.
यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन उपअधीक्षक दीपक जोशी, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, महादेव रोडगे, विक्रम हलकीकर आदी उपस्थित होते. उदगीरला पूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला. हा मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. या संधीचे सोने करीत उदगीर येथील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाख रुपयांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. या टप्प्यात आतापर्यंत एकूण ८६ लाख रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.
तिसऱ्या टप्प्यात सोमवारी बीदर जिल्ह्यातील भालकेश्वर साखर कारखान्याची साखर मुंबई येथे पाठविण्यात आली. या वाहतुकीमुळे उदगीर रेल्वेस्थानकातून होणाऱ्या नफ्यात मोठी भर पडली आहे. भविष्यात सोयी- सुविधा तसेच विविध मंजुरीसाठी लाभ होणार आहे. दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन उपअधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेट देऊन या वाहतुकीचे महत्त्व, सुरक्षितता व फायदा जाणीव करून दिल्यानंतर आता नाेंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.