मेवापूर, शिवाजीनगर तांडा पाझर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:05+5:302021-05-20T04:21:05+5:30
शिवाजीनगर तांड्याची लोकसंख्या १ हजाराच्या जवळपास आहे तर मेवापूरची लोकसंख्या दीड हजाराच्या जवळपास आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यामुळे ...

मेवापूर, शिवाजीनगर तांडा पाझर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करा
शिवाजीनगर तांड्याची लोकसंख्या १ हजाराच्या जवळपास आहे तर मेवापूरची लोकसंख्या दीड हजाराच्या जवळपास आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यामुळे गावच्या जलयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्याने गावकऱ्यांना दोन- दोन किमीपर्यंत भटकंती करावी लागत आहे.
गावातील पाणीपुरवठ्यासाठी आणि पशुधनास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावाच्या शेजारी पाझर तलाव निर्माण करण्यात आला होता. परंतु, काही वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांडवा पूर्णपणे वाहून गेला आहे. सदरील सांडव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सातत्याने लघुपाटबंधारे विभागासह स्थानिक प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु, त्याकडे संबंधितांचे अद्यापपर्यंत दुर्लक्ष झाले आहे.
दरवर्षी या दोन्ही गावांतील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहे. जर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करण्यात आल्यास सिंचनास मदत होईल. तसेच विहिरीत पाणी राहील आणि पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने लक्ष द्यावे...
सदरील तलावाची निर्मिती सन १९९०- ९१ मध्ये झाली. काही वर्षांपूर्वी तलावाचा सांडवा वाहून गेला आहे. परंतु, संबंधितांनी अद्यापही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मेवापूर व शिवाजीनगर तांड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी दोन- दोन किमी पायपीट करावी लागत आहे. सदरील पाझर तलावाचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी सरपंच तानाजी राठोड, महेताब बेग, शिरीष चव्हाण, भीमराव राठोड, शिरीष चव्हाण, रामराव राठोड, सरपंच मीनाताई राठोड आदींनी केली आहे.