आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:55+5:302021-04-16T04:18:55+5:30

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० ...

Message waiting for students selected in RTE draw | आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले असून, राज्यस्तरावर एकच सोडत काढण्यात आली आहे. मात्र, लॉटरी निघालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निवडीचे संदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संदेश कधी मिळणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये १७४० जागा असून, ३० मार्च ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत ४०२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पालकांना प्राप्त झालेले नाहीत. आरटीईच्या संकेतस्थळावर १५ एप्रिलनंतर संदेश पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २३८ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर यूआरसी १- १५, लातूर यूआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

संदेश मिळाल्यानंतर घेता येणार प्रवेश...

मोफत प्रवेशासाठी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पाठवलेले नाहीत. संदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लवकरच निवडीचे संदेश मिळतील...

जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले होते. राज्यस्तरावर सोडत जाहीर झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार गुरुवारपासून निवड झालेल्या पालक, विद्यार्थ्यांना संदेश प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार असून, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.

Web Title: Message waiting for students selected in RTE draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.