आधुनिकतेची कास धरत मूर्तिकलेतून साधले अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:14+5:302021-09-14T04:24:14+5:30

वलांडी : देवणी तालुक्यातील जवळगा येथील कुंभार कुटुंबातील दोन भावंडांनी आधुनिकतेची कास धरत आपल्या हातांच्या कलाकुसरीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून ...

The meaning of modernity is achieved through sculpture | आधुनिकतेची कास धरत मूर्तिकलेतून साधले अर्थकारण

आधुनिकतेची कास धरत मूर्तिकलेतून साधले अर्थकारण

वलांडी : देवणी तालुक्यातील जवळगा येथील कुंभार कुटुंबातील दोन भावंडांनी आधुनिकतेची कास धरत आपल्या हातांच्या कलाकुसरीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती, लक्ष्मीचे मुखवटे, खेळणी साहित्य तयार केले. या साहित्याने परभणी, उस्मानाबाद, कर्नाटकातील सीमावर्ती भागातील मुख्य बाजारपेठेत स्थान पटकावले असून, गणेशमूर्ती व लक्ष्मी मुखवटे, तसेच खेळणी विक्रीतून पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

पूर्वी बारा बलुतेदारांपैकी कुंभार हा प्रथम बलुतेदार म्हणून ओळखला जायचा. वापरात येणारी प्रत्येक भांडीही मातीची असायची. आता स्टील, प्लॅस्टिक, मेटलच्या भांड्यांमुळे कुंभार व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे देवणी तालुक्यातील जवळगा येथील संगप्पा आणि लिंगप्पा कुंभार या पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आधुनिकतेची कास धरत गेल्या पाच वर्षांपासून पीओपीपासून गणेशमूर्ती, लक्ष्मीचे मुखवटे, खेळणी वस्तू बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ते माती व पीओपीपासून गणेशमूर्ती बनवितात. फेब्रुवारी ते सप्टेंबरपर्यंत मूर्ती बनविण्याचा व्यवसाय चालू असतो. परंतु कोरोनामुळे बनविलेल्या मूर्ती विकण्यात न आल्याने दोन ते तीन लाखांचा आर्थिक फटका बसला. यावर्षी कोरोनाचे निर्बंध कमी होताच पुन्हा नव्या उमेदीने मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला. शाळा नसल्याने दोन्ही भावंडांच्या साक्षी, नीशा, अक्षरा, नम्रता व मुलगा अक्षय या दहा वर्षांच्या भावंडांनी मिळून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती तयार करून स्वतः कलर करून विक्री केल्या. त्यातून या चिमुकल्यांना बत्तीस हजाराचा नफा मिळाला आहे. या उत्पन्नातून ही भावंडे स्मार्ट फोन घेऊन ऑनलाईन शिक्षण घेणार असल्याचे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अक्षराने सांगितले.

सीमावर्ती भागात साहित्याला मागणी...

संगप्पा व लिंगप्पा या दोन भावंडांनी बनविलेल्या मूर्तींना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे मागणी आहे. मूर्ती बनविण्यासाठी व इतर कामासाठी त्यांना त्यांची आई, पत्नी, भाची वैष्णवी शशिकांत कुंभार यांची मदत मिळते. या व्यवसायातून त्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या भाचास आर्थिक पाठबळ देऊन एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली आहे. लहान मुलांना कामाबरोबरच शिक्षणाचे धडे शिकविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The meaning of modernity is achieved through sculpture