- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरातील अंबाजोगाई रोडवर ११ मार्च रोजी एका तरुणाला अर्धवस्त्र होईपर्यंत भरदिवसा रस्त्यावर मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. अशाच काही प्रकरणांत संघटितपणे गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या ७ जणांविरुद्ध लातूर पोलिसांनी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. आता वेगवेगळ्या गुन्ह्यातील कलमांशिवाय मकोकाअंतर्गत पुढील तपास होऊन आरोपपत्र दाखल होणार आहे.
लातुरातील एका बारमध्ये एकत्र बसल्यानंतर बिल देण्यासाठी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली, त्याला फिर्यादीने नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर भररस्त्यावरून फरफटत अर्धवस्त्र होईपर्यंत मारहाण सुरू ठेवली. चाकू, बीअरची बाटली, कत्ती, रॉडचा वापर करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांत १२ मार्च रोजी दाखल गुन्ह्यामध्ये म्हटले आहे. याप्रकरणी अक्षय माधवराव कांबळे (वय २७), अजिंक्य नीळकंठ मुळे (२८), साहिल रशीद पठाण (२४), बालाजी राजेंद्र जगताप (२७), नितीन शिवदास भालके (२८), प्रणव प्रकाश संदीकर (२७) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड पडताळून पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे दिला. त्यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला. त्यानुसार सातही आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. आता या कायद्याअंतर्गत पुढील तपास होऊन आरोपपत्र दाखल केले जाईल. राज्याचे अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्या मान्यतेनंतर मकोका प्रस्ताव अंतिम होईल.
सराईत गुन्हेगारांवर कठाेर कारवाई करु...सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. भररस्त्यात मारहाण करून, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील आरोपींकडून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असेल तर त्यांच्याविरुद्ध मकोका लावला जाईल. - सोमय मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, लातूर