दोन वर्षांपासून संपादित जमिनीचा मावेजा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:17+5:302021-09-12T04:24:17+5:30

रेणापूर- पिंपळफाटा ते पानगाव या महामार्ग क्र. ३६१- एच रस्त्यासाठी व रेणा नदीवरील नवीन पुलासाठी प्रशासनाने २६ मे २०१८ ...

Maveja of acquired land has not been received for two years | दोन वर्षांपासून संपादित जमिनीचा मावेजा मिळेना

दोन वर्षांपासून संपादित जमिनीचा मावेजा मिळेना

रेणापूर- पिंपळफाटा ते पानगाव या महामार्ग क्र. ३६१- एच रस्त्यासाठी व रेणा नदीवरील नवीन पुलासाठी प्रशासनाने २६ मे २०१८ रोजी जमीन संपादित केली. या कामासाठी ज्ञानोबा कोतवाड यांची २ हजार २५१.२४ चौ.मी., सरिता संजय आकनगिरे यांची १७९.३७ चौ.मी., अंगद पाटील यांची ६७.५० चौ.मी., काशीबाई निवृत्ती भिकाणे यांची ४ हजार ८०२.४४ चौ.मी., ईश्वरप्रसाद पुनपाळे यांची १ हजार ८२९.९७ चौ.मी., बालाजी जाधव यांची २७४.७९ चौ.मी, तर व्यंकट शिंगडे यांची ११८.८६ चौ.मी. अशी एकूण ९ हजार ५२४.१७ चौ.मी. जमीन संपादित करण्यात आली. त्याचा आवार्डही घोषित झाला.

या संपादित जमिनीचा एकूण मावेजा २ कोटी ७५ लाख ६९ हजार ५२४ रुपये आहे. तो मावेजा शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातील सर्व कार्यवाही पूर्ण झाली. तसेच रस्त्यालगत रेणा नदीवर पूलही बांधण्यात येऊन वाहतूकही सुरु झाली. परंतु, शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप दमडाही पडला नाही.

निवेदन दिल्यानंतर केवळ आश्वासन...

जमीन संपादित दोन वर्षांचा कालावधी उलटला. त्यामुळे मावेजा मिळावा म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरु केला आहे. मावेजासाठी सातत्याने संबंधित कार्यालयाकडे हेलपाटेही मारले. निवेदन दिल्यानंतर तात्काळ मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले. परंतु अद्याप त्याची पूर्तता करण्यात आली नाही.

स्वतःची जमीन देवून पैशासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, अशी खंत ईश्वरप्रसाद पुनपाळे, ज्ञानोबा कोतवाड, अंगद पाटील, बालाजी जाधव, व्यंकट शिंगडे यांच्यासह अन्य शेतक-यांनी व्यक्त केली. येत्या १५ दिवसांत मावेजा न मिळाल्यास संबंधित कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

Web Title: Maveja of acquired land has not been received for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.