कागदपत्रांची जुळवाजुळव, इच्छुकांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:13+5:302020-12-27T04:15:13+5:30

अहमदपूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. कोणते ...

Matching documents, aspirants are exhausted | कागदपत्रांची जुळवाजुळव, इच्छुकांची होतेय दमछाक

कागदपत्रांची जुळवाजुळव, इच्छुकांची होतेय दमछाक

अहमदपूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. कोणते कागदपत्रे कशा पद्धतीने सादर करावे, याबाबत अनेक इच्छुकांत संभ्रम आहे. त्यातच सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अनेकांचे जात प्रमाणपत्र कार्यालयात अडकून पडल्याचे दिसून येत आहे.

तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे इच्छुक नामनिर्देशन पत्रासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. उमेदवारी दाखल करताना १९ कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन धावपळ होत आहे. त्यातच ऑनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. इच्छुकांची सोय व्हावी म्हणून तहसील कार्यालयाच्या वतीने नामनिर्देशन पत्रासोबत भरावयाच्या कागदपत्रांची यादी डकविण्यात आली आहे. त्यावर शपथपत्र ,स्वयंघोषणापत्र, हमीपत्र असा उल्लेख आहे. त्यामुळे ही कागदपत्रे साध्या कागदावर द्यायची की मुद्रांकावर द्यायची, हे स्पष्ट होत नाही. त्यातच काही जणांनी आगाऊ शंभर रुपयांचे मुद्रांक खरेदी करुन ते देत आहेत. छाननीमध्ये हे योग्य ठरेल का याबाबत संभ्रमावस्था आहे.

काही गावांतील इच्छुकांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. सुट्यांमुळे त्यांचे प्रस्ताव तिथेच आहेत. याबाबत उपविभागीय कार्यालयाने त्वरित त्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर जात पडताळणी समितीकडे अर्ज दाखल करण्याची पावती आवश्यक आहे.

७ वी पासचा नवा नियम...

नवीन शासन निर्णयाप्रमाणे १९९५ नंतर जन्मलेल्या इच्छुकाला उमेदवारी अर्ज दाखल करताना ७ वी पासची अटही आहे. त्यामुळे पॅनलप्रमुखांना आरक्षित जागेवर उमेदवार मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत दोन ग्रामपंचायतींसाठी केवळ १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये सर्वच ठिकाणचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. काही ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासंदर्भात चर्चा होत आहे.

मुद्रांकाची गरज नाही...

नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने कुठल्याही प्रकारचे मुद्रांक देऊ नये. साध्या कागदावर नोटरी करून सदर हमीपत्र, शपथपत्र व स्वयंघोषणापत्र द्यावयाचे आहेत, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Matching documents, aspirants are exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.