लातूर : शहरातील नवीन नांदेड नाका, रिंगराेड परिसरात असलेल्या प्लायवूड, सागवान लाकडाच्या कारखान्याला बुधवारी पहाटे २:३० वाजता भीषण आग लागली. यामध्ये लाखाेंचे साहित्य, प्लायवूड, सागवान चाैकटी, खिडक्या जळून खाक झाल्या. या घटनेची विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात दुपारी नाेंद करण्यात आली.
लातूर शहरात नवीन नांदेड नाका, रिंगराेड परिसरातील हरिओम टिंबर, प्लायवूड निर्मिती आणि विक्री कारखान्याला बुधवारी पहाटे २:३० वाजता भीषण आग लागली. पहाटे अचानकपणे आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती वाॅचमनने मालक बाबुभाई पटेल यांना तातडीने दिली. शिवाय, हेल्पलाईनवर पाेलिसांनाही माहिती देण्यात आली. या माहितीनंतर विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संताेष पाटील हेही कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पहाटे ३ वाजल्यापासून अग्निशमन दलाच्या तीन बंबांद्वारे आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही आग आटाेक्यात आणण्यासाठी सकाळी १० वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच हाेते. या आगीमध्ये जवळपास काेटींच्या घरात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाेलिसांकडून घटनेची नाेंद करण्यात आली असून, गुरुवारी पंचनामा करण्यात येणार आहे.