'विवाह प्रमाणपत्र हवय, आधी वृक्षारोपण करा'; बोरगाव काळे ग्रामसभेचा क्रांतिकारी ठराव
By संदीप शिंदे | Updated: August 31, 2023 14:58 IST2023-08-31T14:56:50+5:302023-08-31T14:58:19+5:30
वृक्षारोपण करून त्यासोबत पति-पत्नीचा फोटो देणे बंधनकारक

'विवाह प्रमाणपत्र हवय, आधी वृक्षारोपण करा'; बोरगाव काळे ग्रामसभेचा क्रांतिकारी ठराव
बोरगाव काळे ( लातूर) : आपल्या वृद्ध आईवडिलांना मुले व सुना सांभाळत नाहीत अशा सुना व मुलांना ग्रामपंचायतीतून वारसाहक्क व मृत्यू प्रमाणपत्र मिळणार नाही. तसेच विवाह प्रमाणपत्रासाठी वृक्षारोपण करून त्यासोबत पति-पत्नीचा फोटो देणे बंधनकारक करण्याचा ठराव बोरगाव काळे येथील ग्रामसभेत घेण्यात आला.
बोरगाव काळे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी सकाळी सरपंच अनिता दीपक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच छाया देशमुख, माजी उपसरपंच डॉ. कैलास काळे, माजी चेअरमन दीपक काळे, कृषी सहायक एम.जी. घुले, ग्रामविकास अधिकारी उद्धव डोंगरे, पशु चिकित्सक डॉ. हजारे, हणमंत महाराज काळे, पवन देशमुख, सतीश देशमुख, सुरेश आदमाने, दादा पवार, सुंदर देशमुख, नवनाथ घोडके, अशोक काळे, दिलीप आदमाने, सचिन भिसे, भागवत आदमाने, नीळकंठ काळे, भारत कांबळे, राजाभाऊ कुंभार, किशोर क्षीरसागर, आप्पा काळे आदी उपस्थित होते.
यावेळी मराठा भवनसाठी पोस्ट ऑफिस समोरील जुन्या ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव घेण्यात आला. ग्रामविकास अधिकारी डोंगरे यांनी मागील इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर गावातील मुख्य रस्ते, गावठाणवरील अतिक्रमण, जि.प. शाळेतील शुद्ध पाणी पुरवठा, पाणंद रस्ते, अपंगांचे प्रश्न, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आदी विषयावर चर्चा करण्यात आली.