सर्वधर्मीय गुरूंच्या उपस्थितीत विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:50+5:302021-01-04T04:17:50+5:30
निलंगा येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद चोपणे यांचे सुपुत्र दीपक याने अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतली असून, याच शाखेतून पदवी मिळविलेली ...

सर्वधर्मीय गुरूंच्या उपस्थितीत विवाह सोहळा
निलंगा येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद चोपणे यांचे सुपुत्र दीपक याने अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतली असून, याच शाखेतून पदवी मिळविलेली कुर्डूवाडी येथील दिनकर गोरे यांची कन्या ज्योती हिचा विवाह रविवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडला. यावेळी विविध धर्मांतील रीतिरिवाजाप्रमाणे सर्व विधी झाल्या. त्यानंतर नवदाम्पत्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची विचारप्रणाली स्वीकारून समाजवादी, विज्ञानवादाच्या विचारांचा जीवनात आचरण करीन, अशी शपथ घेतली.
या विवाह सोहळ्यास सर्व धर्मगुरूंची उपस्थिती होती. त्यामुळे अधिक उत्सुकता दिसून येत होती. यावेळी श्रीमती सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी खा. सुनील गायकवाड, आ. अभिमन्यू पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, अभय सोळुंके, महाराष्ट्र शिक्षण समितीचे कार्याध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब शिंगाडे, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीताताई चोपणे म्हणाल्या, युवा पिढीने अशा पद्धतीने विवाह सोहळा होणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या विचारांचे आचरण करून बदल घडविला पाहिजे. कृतीतून बदल घडविण्यासाठी समाजाने सज्ज राहावे, असे दयानंद चोपणे म्हणाले. सूत्रसंचालन गिरी, रजनीकांत कांबळे, विलास सूर्यवंशी, अस्लम झारेकर यांनी केले.
धर्मगुरूंनी दिले आशीर्वाद
यावेळी हजरत दादा पीर दर्गाचे सज्जादा नशीन सय्यद शहा हैदरवली, नांदेडच्या गुरुद्वाराचे सेपोदर कुलविंदर सिंग, बीदरचे फादर सुनील हुलसू, कर्नाटक कराळीचे भन्ते धम्मासागर व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनंतराव सबनीस यांनी नववधू-वरास आशीर्वाद दिले.