लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षासह यंदाच्या वर्षी अनेक महिने लॉकडाऊन होते. या काळात मैदाने बंद होती. यामुळे खेळाडूंच्या दैनंदिन सरावाला मर्यादा आल्या. घरच्या घरीच फिटनेस करत खेळाडूंनी काही अंशी तंदुरुस्ती राखली; मात्र कोविडचा प्रादुर्भाव पुढेही झाला तर मैदाने बंद असताना खेळाडूंनी घरच्या घरीच कसा फिटनेस राखावा, यासाठी लातूरच्या दोन संशोधक मार्गदर्शकांनी फिटनेस मंत्र दिला असून, याद्वारे आठ व्यायाम प्रकार खेळाडूंची लय कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. नल्ला भास्कर रेड्डी व देवणी येथील क्रीडा संचालक प्रा.डॉ. सचिन चामले यांनी लॉकडाऊन काळात खेळाडूंना फिजिकल फिटनेसचा मंत्र दिला आहे. जेणेकरून आपली कामगिरी ते कायम राखतील. यात सात प्रकारचे व्यायाम प्रकार दिले असून, साथीच्या रोगात खेळाडूंसाठी व्यायाम महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे.
दैनंदिन प्रशिक्षणात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने शरीर सुदृढ राहण्यासाठी त्यांनी ७ व्यायाम प्रकार खेळाडूंना सुचविले आहेत.
यात कार्डिओ व्यामाय, स्ट्रेंथ, स्नायूचा दमदारपणा वाढविणारे व्यायाम, लवचिकता आणि गतिशीलता वाढविणे, पोटाच्या स्नायूची ताकद वाढविणे, दिशाभिमुखता व्यायाम प्रकार, तोल सांभाळणारे व्यायाम आणि समन्वय वाढविणाऱ्या व्यायामांचा समावेश आहे.
यानुसार घरच्या घरीच दैनंदिन व्यायाम केल्याने खेळाडूंचा लय कायम राहील, असे या दोन्ही संशोधक मार्गदर्शकांनी सूचविले आहे. त्यानुसार कार्डिओ व्यायाममध्ये हळूवार चालणे, जागेवर जॉगिंग, जम्पिंग जॅक यासह १३ व्यायाम प्रकार त्यांनी सांगितले आहेत. शक्ती वाढविण्यासाठी पुशअप्स, चीनअप्स, पूलअप्स, प्लॅलांक, ट्रायसेप बॉक्स डीप, हॅन्डवॉकिंग हे अपर बॉडिसाठी तर लोअर बॉडिसाठी लंजेस, स्क्वॅटस् गरजेचे आहे. स्नायूचा दमदारपणा वाढविण्यासाठी स्लो सिटअप्स, स्लोपुशअप, स्क्वॅट तसेच लवचिकता वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार, हॅमस्ट्रींग स्ट्रेच शोल्डर राेल, ताडासन, चक्रासन, धनुरासन, त्रिकोणासन यासह अन्य व्यायाम प्रकार. पोटांच्या स्नायूची ताकद वाढविण्यासाठी सिटप्स, क्रंच, लेगलिफ्ट, अल्टरनेट हिलटचेस यांसह अन्य व्यायाम. दिशाभिमुखता वाढविण्यासाठी लंगडी, शटल रन, हॉट ड्रिल, टी ड्रिल, एजीलीपी लेडरड्रील. तोल सांभाळणाऱ्या व्यायामासाठी स्टँडिंग स्लोवॉक, स्टँडिंग वनलेग फॉर साईड किक, वन लेग स्टँड, हिल-टो स्टँडिंग, टी-स्टँड तर समन्वय वाढविणाऱ्या व्यायामासाठी दोरीवरच्या उड्या, जागेवरच जॉगिंग करत बॉल कॅच करणे, हाथ एकमेकांच्या विरुद्ध गोल फिरविणे, लहान बॉल भिंतीवर टायपिंग करणे, लेडरड्रील यांसह अन्य व्यायाम प्रकार त्यांनी सुचविले आहेत. एकंदरित हे सर्व व्यायाम प्रकार लॉकडाऊन काळात खेळाडूंच्या फिटनेससंबंधी दिशादर्शक ठरणार आहेत.
व्यायामासह आहार व मानसिक आरोग्यही महत्त्वाचे...
या सर्व व्यायामासह खेळाडूंनी दैनंदिन आहारावरही लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेडचे सेवन केल्यास तंदुरुस्ती कायम राहते. योग्य विश्रांती व मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यासाठी आनंदी राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.