लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडली.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. लातूर येथे त्यांची बैठक सुरू असताना राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली. मुंबईला येण्यापेक्षा काहीतरी तोडगा चर्चेतून काढू, अशी सरकारची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी त्यांना सांगितले. तत्पूर्वी आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जणार नाही. उगीचच आम्ही कुणाला टार्गेट का करू, असे जरांगे-पाटील म्हणाले.