आंब्याची सुगी अन् जावई बापूंना रसाचा पाहुणचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:38+5:302021-05-22T04:18:38+5:30
चापोली : यावर्षी आंब्याचा हंगाम चांगला असला तरी कोरोनामुळे जावई बापूंना रसाच्या पाहुणचाराचा आनंद घेता येईनासा झाला आहे. परिणामी, ...

आंब्याची सुगी अन् जावई बापूंना रसाचा पाहुणचार नाही
चापोली : यावर्षी आंब्याचा हंगाम चांगला असला तरी कोरोनामुळे जावई बापूंना रसाच्या पाहुणचाराचा आनंद घेता येईनासा झाला आहे. परिणामी, लेकीसाठी सासरीच आंबे पाठविल्यास बरे होईल, असा सूर ऐकावयास मिळत आहे.
फळांचा राजा असलेल्या यंदा आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. आंबा, त्याचा रस अबालवृध्दांना आवडतो. सध्या चापोलीसह परिसरात गावरान, केशर, मलगोबा आंब्याचे उत्पादन आहे. गावरान ५० ते ६० रुपये तर केशर, मलगोबा ७० ते ८० किलो दराने विक्री होत आहे. यंदा सर्वच ठिकाणी आंब्याचे उत्पादन अधिक झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन आहे. बससे बंद आहेत. त्यामुळे रेलचेल बंद झाली आहे. आबांच्या हंगामात जावईबापूंना दरवर्षी रस- पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून बोलाविले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे जावईबापू रस- पोळीच्या निमंत्रणापासून वंचित राहत आहेत. यंदा हा कार्यक्रम घरीच घेऊ, असे जावईबापू म्हणत आहेत. सण, पाहुणचारालाही नातेवाईकांना मुकावे लागले.
कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद असून बच्चे कंपनी घरातच आहेत. तसेच परीक्षाही नाहीत. उन्हाळा सुरु झाले की, बच्चे कंपनीही मामाच्या गावी जाण्यासाठी आतुरता असते. मात्र, यंदा मुले मामाच्या गावाला जाण्यास मुकली असल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे.
उन्हाळ्यात रस- पोळीची प्रथा...
कोरोनामुळे कुठेही जाता येत नाही. घरीही कोणाला येता येत नाही. अक्षय तृतीयेपासून आंब्याच्या रसाला सुरुवात होते. दरवर्षी उन्हाळ्यात जावयाला बोलावून रस- पोळीचे भोजन देण्याची प्रथा आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे त्यावर विरजन पडले आहे.