ऑनलाईन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंदच आहेत. त्यामुळे शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दोन सत्रात ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात विद्यार्थ्याना नेटवर्कच्या अडथळ्यामुळे ऑनलाईन अभ्यासापासून वंचित राहावे लागत आहे. सर्वच शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण समाधानकारक असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दुभाजकातील कचरा उचलण्याची मागणी
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड आदी मार्गावर दुभाजकात कचरा टाकला जात आहे. दरम्यान, वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांची कसरत
लातूर : शहरातील अंतर्गत रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात होती. याबाबत संबधित विभागाला निवेदनही देण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.