१५ गावांना जोडणारा मुख्य रस्ता चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:04+5:302021-07-16T04:15:04+5:30
रेणापूर : तालुक्यातील कामखेडा हे मोठे गाव असून येथून १५ गावांना जोडणारा रस्ता आहे. मात्र, रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाळ्यात ...

१५ गावांना जोडणारा मुख्य रस्ता चिखलमय
रेणापूर : तालुक्यातील कामखेडा हे मोठे गाव असून येथून १५ गावांना जोडणारा रस्ता आहे. मात्र, रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कामखेड हे पंचायत समिती गणाचे गाव असून गावात ग्रामपंचायत आहे. गावची लोकसंख्या ६ हजारांपेक्षा जास्त आहे. गावापासून दोन किमी अंतरावर रेणा मध्यम प्रकल्प आहे. त्याचबरोबर गावातून जाणारा मुख्य रस्ता १५ पेक्षा जास्त गावांना जोडतो. अंबाजोगाई, परळी, बीडला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून हातोला, वाला, वालेवाडी, तत्तापूर, बिटरगाव, गरसुळी, वंजारवाडी, बर्दापूर, अंबाजोगाई, पानगाव, भंडारवाडी अशा गावांना जावे लागते.
मात्र, दोन वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कामखेड्यातील नागरिकांना अन्य गावाला ये-जा करण्यासाठी चिखलमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. चिखलमय रस्त्यामुळे दुचाकी नेहमी घसरत आहेत. त्यामुळे काही जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी सातत्याने रस्ता दुरुस्ती मागणी केली. परंतु, अद्याप दोन वर्षांपासून त्याकडे लक्ष दिले नाही.
दुचाकी घसरण्याच्या घटना...
चिखलमय रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काही दुचाकी स्लीप होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत. रस्त्याच्या या स्थितीमुळे गैरसाेय होत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मात्र, त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता रेणा मध्यम प्रकल्पावर जाण्यासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे. दरवर्षी पावसाळ्यात जवळपास तीन महिने अशीच अवस्था राहते.
जिल्हा परिषदेकडून मंजुरी...
या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेकडून मंजूर झाले आहे, असे अभियंत्यांनी सांगतले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी किती व कधी याची आम्हाला माहिती नाही. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून कुठलाही प्रस्ताव नाही. कारण एखादे काम मंजूर झाल्यानंतर ते ग्रामपंचायतीला दुरुस्त करता येत नाही, असे कामखेडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रकाश काळे यांनी सांगितले.