रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील आसराचीवाडी येथे विद्युत पोलला बांधलेल्या तारेचा शॉक लागून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत आणखीन दोघेजण जखमी झाले आहेत. अभिषेक गणपत चुणचुने असे मयत युवकाचे नाव आहे.
रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी येथील गणपत चुणचुने यांच्या घरासमोर महावितरणचा वीजपुरवठा करणारा सिमेंटचा पोल आहे. या पोलला एक लोखंडी तार गुंडाळण्यात आली होती. त्या तारेमध्ये विद्यूत प्रवाह उतरला होता. दरम्यान, विशाल तंबुरे (वय १२) हा पोलला गुंडाळून ठेवलेल्या तारेला चिकटल्याने त्याने आरडाओरड केली. तेथे जवळच असलेल्या अभिषेक गणपत चुणचुने व कुमार रमेश उद्रे यांनी मुलास बाजुला काढले. मात्र, अभिषेक याला विजेचा धक्का लागल्याने तो फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने कारेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी लातूरला पाठविले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात जात असतानाच अभिषेक चुणचुने याचा मृत्यू झाला. तर विशाल व कुमार या दोघांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
महावितरणचा हलगर्जीपणा...बारा दिवसांपूर्वी आसराचीवाडी येथे सिंगल फेजचे काम चालू होते. हे काम करताना गणपत चुणचुने यांच्या घरासमोर सिमेंट पोलला सिंगल फेजसाठी वापरता येणारी लोखंडी तार तशीच गुंडाळून ठेवण्यात आली हाेती. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ती तार काढली नाही. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अभिषेक चुणचुने याचा मृत्यू झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य नामदेव हाके यांनी सांगितले. तर आसराचीवाडी येथील घटनेची पाहणी करणार असल्याचे महावितरणचे शाखा अभियंता इस्माईल शेख यांनी सांगितले.