आर्थिक गुंतवणूक म्हणून अनेक जण प्लाॅट, शेती आणि इतर मालमत्ता खरेदी करतात. मात्र, शहरात खरेदी केलेला प्लाॅट आणि त्यावर अनेक वर्ष काेणत्याही प्रकारचे बांधकाम केले जात नाही. मूळ मालक बाहेरगावी राहतात, परिणामी, प्लाॅटकडे महिना - सहा महिने फिरकत नाहीत. अशा माेकळ्या स्वरुपाच्या प्लाॅटवर शेजाऱ्यांबराेबरच काही भू-माफिया अतिक्रमण करीत असल्याचे समाेर आले आहे. प्लाॅट हडप करणे, अतिक्रमण करण्याचे वाद त्या-त्या पाेलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. एनए प्लाॅट खरेदी केला असल्यास त्याबाबत पाेलीस ठाणे, न्यायालयात दाद मागता येते. यातून न्याय मिळण्याची शक्यता असते. मात्र, अनधिकृतरित्या ले-आऊटनुसार प्लाॅटची खरेदी-विक्री केली तर मालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनेक प्रकरणात प्लाॅटच्या मालकी हक्कावरून हाणामारी, खुनाच्या घटना घडल्या आहेत.
एकच प्लाॅट, अनेकांच्या नावावर...
लातूर शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी प्लाॅट खरेदी करताना मूळ मालकांकडील मूळ कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे. संबंधित कार्यालयातून कागदपत्रांची चाैकशी, खातरजमा करण्याची गरज आहे. नाही तर फसवणूक हाेण्याची शक्यता अधिक आहे.
अवैध प्लाॅट असल्यास सावधानता बाळगा...
एखाद्या परिसरात प्लाॅटची खरेदी करताना सर्व कागदपत्रांची चाैकशी करा. खरेदीचा व्यवहार तातडीने करू नका. चाैकशीसाठी पुरेसा वेळ घ्या, संबंधित कार्यालयात रितसर चाैकशी, कागदपत्रांची पडताळणी करा. मूळ मालकांशी संपर्क साधून प्रारंभी चर्चा करा. मूळ जमिनीची नाेंद, प्लाॅटिंगसाठी करण्यात आलेली प्रक्रिया याचीही पाहणी केली पाहिजे. मूळ मालक स्वत:च जमिनीचे तुकडे पाडून लेआउट टाकताे. मात्र, त्याच्या नकाशाला मान्यता आहे का? एनए मंजुरी आहे का? याचीही चाैकशी केली पाहिजे. अशावेळी रितसर एनए लेआउटच्याच प्लाॅटची खरेदी करावी.
प्लाॅटमालकांनी अशी घ्यावी काळजी...
प्लाॅटची खरेदी केल्यानंतर तातडीने त्यास सिमेंटचे खांब गाडून तारेचे कुंपण करून घेण्याची गरज आहे. सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले तर उत्तमच आहे. प्लाॅट खरेदी केल्यानंतर लागलीच रजिस्ट्रीचा व्यवहार पूर्ण करून घ्यावा. त्याचबराेबर प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कुणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर असलेला फलक लावण्याची गरज आहे. प्लाॅटमालक इतर ठिकाणी राहात असल्यास, दर चार दिवसांनी, आठवड्यांनी प्लाॅटकडे चक्कर मारून पाहणी करावी. यातून रिकाम्या प्लाॅटचे संरक्षण हाेईल.