लातुरात अपुऱ्या मनुष्यबळावर ‘लम्पी’चा सामना ! लसीकरण, औषधोपचाराला येतेय अडचण
By हणमंत गायकवाड | Updated: September 28, 2022 17:06 IST2022-09-28T17:05:32+5:302022-09-28T17:06:15+5:30
जिल्ह्यासाठी एकूण १०१ पशुवैद्यकीय पर्यवेक्षक मंजूर आहेत. त्यापैकी ७१ जागांची भरती करण्यात आली असून, ३० जागा रिक्त आहेत.

लातुरात अपुऱ्या मनुष्यबळावर ‘लम्पी’चा सामना ! लसीकरण, औषधोपचाराला येतेय अडचण
लातूर : पशुधन पर्यवेक्षकांची ३० टक्के पदे रिक्त असल्यामुळे लसीकरण आणि औषधोपचार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावरच पशुधनातील चर्मरोगाचा सामना पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
जिल्ह्यासाठी एकूण १०१ पशुवैद्यकीय पर्यवेक्षक मंजूर आहेत. त्यापैकी ७१ जागांची भरती करण्यात आली असून, ३० जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे सद्य:स्थितीत फक्त ७१ पशुधन पर्यवेक्षक आहेत. त्यात लातूर तालुक्यात १२, औसा ८, निलंगा ७, रेणापूर ४, चाकूर १०, उदगीर १६, अहमदपूर ८, देवणी १, जळकोट ४, शिरूर अनंतपाळ १ अशी एकूण ७१ पदे भरली आहेत.
३० जागा रिक्त...
पशुधन पर्यवेक्षकाच्या एकूण ३० जागा रिक्त आहेत. त्यात लातूर १, औसा ३, निलंगा ५, रेणापूर २, चाकूर २, उदगीर ७, अहमदपूर ३, देवणी २, जळकोट १, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४ पशुधन पर्यवेक्षक रिक्त आहेत.
पशू दवाखान्यामध्ये उपचार अन् लसीकरण
लम्पी स्किन डिसीजच्या उपचारासाठी पशू दवाखान्यामध्येही उपचार आणि लसीकरण केले जात आहे. लातूर तालुक्यातील १६, निलंगा तालुक्यातील १५, औसा १५, उदगीर २५, अहमदपूर ११, रेणापूर ८, जळकोट ५, देवणी ६, चाकूर १५ आणि शिरूर अनंतपाळ ६ पशुवैद्यकीय दवाखाने पशुधनाच्या सेवेसाठी तत्पर आहेत. दवाखान्यांनी लसीकरणासह उपचार केले जात आहेत. आतापर्यंत ५७ गावांतील ५७७ पशुधनाला लम्पी स्किनचा आजार झाला होता. त्यापैकी १२० पशुरुग्ण बरे झाले आहेत, तर १० पशुधनाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी दिली.
शंभर टक्के लसीकरण
लसीकरणाचे जे उद्दिष्ट आहे, ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ७४ टक्के लसीकरण झाले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ण लसीकरण होईल. दुसऱ्या टप्प्यात शासनाच्या निर्देशानुसार लम्पी स्किन डिसीजचा सामना केला जात आहे. सध्या हा आजार नियंत्रणात आहे.
लम्पी स्किन डिसीजची स्थिती
बाधित गावे ५७
बाधित तालुके ०९
बाधित पशुरुग्ण ५७७
एकूण लसीकरण ९११०८
क्लीन लसीकरण ९१६५२
एकूण लसीकरण १,८२,७६०
खाजगी लसीकरण ७०००
एकूण लसीकरण १,८९,७०७
बरे झालेले पशुरुग्ण १२०
लम्पी आजाराने मृत्यू १०
गोवंश लसीकरण ७४ टक्के