यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो, तर हापूस सहाशे रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:41+5:302021-05-12T04:19:41+5:30

यंदा रत्नागिरीचा हापूस आंबा ६०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत निम्म्याच दराला विक्री करण्यात येत ...

A lot of Amaras this year; Saffron Rs 100 per kg, while hapus Rs 600 a dozen | यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो, तर हापूस सहाशे रुपये डझन

यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो, तर हापूस सहाशे रुपये डझन

यंदा रत्नागिरीचा हापूस आंबा ६०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत निम्म्याच दराला विक्री करण्यात येत आहे. केशर १०० रुपये, पायरी ८०, तर गावरान आंबे हे ७० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता. परंतु, यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्यांचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. तसेच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. लातूर शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

आवक वाढली, ग्राहक रोडावले...

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नागिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबा घेऊन आले आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री होत आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार, असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केली जात आहे. परंतु, ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. दररोज सकाळी गाडा लावल्यानंतर सायंकाळपर्यंत मोजक्याच आंब्यांची विक्री होत आहे.

Web Title: A lot of Amaras this year; Saffron Rs 100 per kg, while hapus Rs 600 a dozen