कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:08+5:302021-04-07T04:20:08+5:30
दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व ...

कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊच !
दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता अन्य आस्थापने बंद राहिली. प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, खानावळी, बार, परमिट रुम, हेअर सलून, ब्युटी पार्लर बंद होती. कपडा, सराफा, लोखंड बाजार, गंजगोलाईतील भुसार लाईन, मेन रोड, गल्लीबोळातील दुकाने बंदच होती. ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू होत्या. मात्र त्यांना प्रवासी नसल्यामुळे ताटकळत थांबावे लागले. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध असल्याने गर्दी त्या तुलनेत विरळच होती. छोट्या-मोठ्या हॉटेलमधून मात्र पार्सल सेवा सुरू होती. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सोमवारी रात्री काय बंद, काय चालू या संदर्भात माहिती दिली होती. मात्र जनतेमध्ये संभ्रम मंगळवारी दिवसभर कायम होता. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक मैदाने, मॉल्स, बाजारपेठा, आठवडी बाजार, खाजगी कार्यालये, सिनेमागृह, व्हिडिओगृहे, प्रेक्षकगृह, करमणूक पार्क, स्वीमिंग टँक, प्लेईंग कार्ड, व्यायामशाळा, जीम, योगा क्लासेस, नृत्यवर्ग, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
नियोजित लग्नाचा बस्ता कोठून बांधायचा?
नियोजित लग्नासाठी ५० लोकांना मुभा आहे. घरच्या घरी लग्न करण्यास परवानगी आहे. परंतु, या लग्नासाठी खरेदी कोठून करायची, असा प्रश्न बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला.
ब्रेक दी चैन नसून, हार्ट दी ब्रेक
शासनाने कोरोनावर औषधोपचार, यंत्रसामुग्रीची सोय तसेच चाचणी, लसीकरण वाढवून कोरोनाला रोखायला हवे होते. कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन लादायला नको होता. या कडक निर्बंधामुळे ब्रेक दी चैन होणार नसून, व्यापाऱ्यांचे हार्ट ब्रेक होईल, अशा शब्दात या निर्बंधाचा निषेध व्यापारी महासंघाचे प्रदीप सोलंकी यांनी केला.
मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता
शासन, प्रशासनाच्या आवाहनाला नेहमीच व्यापाऱ्यांचा प्रतिसाद राहिला आहे. मागील ३२ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिकच नव्हे तर मानसिक अवस्था बिघडलेली आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांतच ५० ते ६० टक्के व्यवसाय वर्षभराचा होत असतो. आता याच महिन्यात लॉकडाऊन केल्याने व्यापारी कसे तगणार, असा प्रश्नही काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. जून,जुलै महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यावेळी व्यवसायही थंड राहतो.