लॉकडाऊनमुळे रस्ते अपघात, घरफोडीच्या घटनांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:18+5:302021-05-14T04:19:18+5:30

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे अहमदपूर उपविभागात रस्ते अपघात व घरफोड्यांच्या घटनांत घट झाली आहे. पोलीस प्रशासन २४ तास रस्त्यावर ...

Lockdown reduces road accidents, burglary cases | लॉकडाऊनमुळे रस्ते अपघात, घरफोडीच्या घटनांत घट

लॉकडाऊनमुळे रस्ते अपघात, घरफोडीच्या घटनांत घट

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे अहमदपूर उपविभागात रस्ते अपघात व घरफोड्यांच्या घटनांत घट झाली आहे. पोलीस प्रशासन २४ तास रस्त्यावर असल्याने आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केल्याने सदर गुन्ह्यांत घट झाली आहे. मात्र, मोटार वाहतूक नियमन व आपत्ती व्यवस्थापनाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अहमदपूर उपविभागाअंतर्गत चार पोलीस ठाणे असून, त्यात अहमदपूर, जळकोट, वाढवणा, किनगाव पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. याअंतर्गत तीन जिल्ह्यांच्या सीमा असून, या चारही ठाण्याअंतर्गत लॉकडाऊनपासून रस्ते अपघातात ५० टक्के घट झाली आहे. घरफोड्यांचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये रस्ते अपघातांची संख्या २५ होती, तर घरफोड्यांचे ९ गुन्हे होते. मात्र, यावर्षी या गुन्ह्यांत घट झाली आहे.

पोलीस २४ तास रस्त्यावर असल्यामुळे आणि संचारबंदीची कठोर अंमलबजावणी केल्याचा परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्याच्या सांगवी सुनेगाव सीमेवर पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, तिथे ३५० वाहनांची नोंद झाली आहे. तसेच दगडवाडी येथे चेक पोस्ट असून, जळकोट पोलीस ठाण्याअंतर्गत जांब येथे तपासणी नाका आहे. जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, मोटार वाहतूक अधिनियमानुसार १७८० कारवाया करण्यात आल्या असून, ३ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. आपत्ती निवारण व्यवस्थेच्या कलम १८८ नुसार २६ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

महिनाभरात चोरीच्या १५ घटना...

एप्रिल २०२० मधील गुन्हे व कंसात एप्रिल २०२१ मधील गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे : चोरी ४९ (१५), घरफोडी ९ (४), खून १ (०), दंगल ४ (१), फसवणूक २ (१), कोविड नियम ० (२६), मोटार वाहतूक नियम १७ (३०) असे प्रमाण राहिले आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी...

चारही पोलीस ठाण्यांच्या वतीने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी केली जात आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.

पोलिसांच्या समन्वय बैठका...

अहमदपूर उपविभागात पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी बैठका घेण्यात येऊन मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले, अहमदपूरचे पो. नि. नानासाहेब लाकाळ, जळकोटचे पो. नि. गणेश सोंडारे, किनगावचे स.पो.नि. व्यंकटवाड, वाढवण्याचे स.पो.नि. बाळासाहेब नरवटे, स.पाे.नि. गजेंद्र सरोदे, रामचंद्र केदार, पो.नि. विजयकुमार पाटील, एकनाथ डंख, नागोराव कुंभार उपस्थित होते.

Web Title: Lockdown reduces road accidents, burglary cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.