साहित्यनिर्मिती भाषा समृद्धीचे माध्यम ठरते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:00+5:302021-03-09T04:22:00+5:30
उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य ...

साहित्यनिर्मिती भाषा समृद्धीचे माध्यम ठरते
उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव परिणाम व आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. सिंदगीकर म्हणाले, मराठी भाषा ही जगातील अत्यंत रसाळ भाषा असून तिच्या जवळपास बावन्न प्रकारच्या बोलीभाषा आहेत. बोली भाषेमुळे मराठी भाषा समृद्ध होते. त्यामुळे लेखकांने मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करावी. तसेच सत्यासाठी आग्रह धरून मानवी मूल्यांचा आविष्कार करावा. जागतिकीकरणाचा मराठी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट ती जागतिकीकरणाचा प्रभाव व परिणाम पचवून काळाची आव्हाने पेलत काळाच्या ओघात टिकून राहील. त्यामुळे मराठी भाषिकांनी कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी 'पाऊसकाळ' या कवितेचे अत्यंत गोड व मधुर आवाजात गायन करून त्यांनी मानवी जीवनाचा अर्थ उलगडून दाखविला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी असे म्हटले की, जोपर्यंत मराठी माणूस भाषेचे मोठ्या प्रमाणात उपयोजन करील तोपर्यंत तिच्या भविष्यकाळाची चिंता करण्याचे कारण नाही. मराठी भाषा ही भविष्यकाळात चिरंतनदायी ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवीदास गायकवाड यांनी केले. आभार डॉ. नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.