पोलीस अधीक्षकांच्या पथकाच्या धाडी; तीन लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:04+5:302021-07-17T04:17:04+5:30
ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील उमा चौकातील मटका जुगारावर धाड टाकली, ...

पोलीस अधीक्षकांच्या पथकाच्या धाडी; तीन लाखांचा ऐवज जप्त
ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील उमा चौकातील मटका जुगारावर धाड टाकली, तेव्हा तिथे जुगाराचे साहित्य आढळले. साहित्यसह मोबाइल असा एकूण २३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी अलिमोद्दिन शेख यास ताब्यात घेण्यात आले.
सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास उदगीर- अहमदपूर रोडवरील अंबिका कॉलनीतून उमा चौकाच्या दिशेने निघालेल्या एका वाहनास (क्र. एमएच २४ व्ही ७६६९) पथकाने थांबविले. त्यात सचिन मसुरे (रा. सोमनाथपूर रोड, उदगीर) याच्याकडून ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्याची किंमत अंदाजे १७ हजार २८० रुपये व वाहनाची किंमत २ लाख ५० हजार असा एकूण २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस ताब्यात घेण्यात आले. पोलीस चंद्रकांत डांगे यांनी दारू प्रकरणी, तर मटका प्रकरणी मोहन सुरवसे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, चौधरी, खंदाडे, शेंडगे हे सहभागी झाले होते.