जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:05+5:302021-06-20T04:15:05+5:30
परवाना रद्द करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये काटगाव येथील अमित फर्टिलायझर्स, अक्षय फर्टिलायझर्स, रेणापूर तालुक्यातील पिंपळ फाटा येथील श्रवणकुमार कृषी सेवा ...

जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
परवाना रद्द करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये काटगाव येथील अमित फर्टिलायझर्स, अक्षय फर्टिलायझर्स, रेणापूर तालुक्यातील पिंपळ फाटा येथील श्रवणकुमार कृषी सेवा केंद्र, पळशी येथील ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र, चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे ओमसाई कृषी सेवा केंद्र, न्यू सावली कृषी सेवा केंद्र निलंगा या दुकानांचा समावेश आहे. या दुकानांचा तपासणी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला होता. त्यानुसार १५ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सुनावणी आयोजित केली होती. त्यामध्ये विक्री परवाना दर्शनी जागी न लावणे, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे स्त्रोत न ठेवणे, साठा रजिस्टर अद्ययावत न करणे, साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, विक्री बिल परिपूर्ण न देणे, वजनकाटा दुकानात न ठेवणे, ई-पॉस मशीनवरील खतसाठा अद्ययावत न करणे, खरेदी बिले न ठेवणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत.
दरम्यान, सदर विक्रेत्यांनी बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक कायदा १९६८ व कीटकनाशक नियम १९७१ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी या आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. यापुढे कृषी सेवा केंद्रात त्रुटी आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिला आहे.