दिव्यांग गटात लातूरचा ओंकार शिरपुरे देशात प्रथम
By संदीप शिंदे | Updated: September 11, 2022 19:09 IST2022-09-11T19:08:54+5:302022-09-11T19:09:41+5:30
नीटनंतर जेईई ॲडव्हान्समध्येही लातूरचा दबदबा कायम

दिव्यांग गटात लातूरचा ओंकार शिरपुरे देशात प्रथम
लातूर: देशभरातील IITसह अन्य नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE ॲडव्हान्स परीक्षेत ओबीसी दिव्यांग गटातून राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार शिरपुरे याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच लातुरातील विविध महाविद्यालयांतील ४० हून अधिक विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
आयआयटी, आयआयएसटी, आयआयएससी, आयआयएसईआर या राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स २०२२ परीक्षा ऑगस्टमध्ये झाली होती. या परीक्षेत शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा ओंकार रमेश शिरपुरे या विद्यार्थ्याने इतर मागास प्रवर्गातून (दिव्यांग गट) देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या महाविद्यालयातील २५ विद्यार्थी तसेच श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय ७, दयानंद विज्ञान महाविद्यालयातील ७ आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, डॉ. चंद्रभानू सोनवणे, डॉ. प्रयागबाई पाटील महाविद्यालयासह विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. शहरातून जवळपास ४० हून अधिक विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले असून, नीटनंतर जेईई ॲडव्हान्समध्येही लातूरचा दबदबा कायम आहे.