ज्ञानेश्वरीने लंडनमध्ये केली कमाल! राष्ट्रकुलमध्ये तलवारबाजी सांघिक गटात पटकावले राैप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:12 PM2022-08-17T18:12:27+5:302022-08-17T18:15:36+5:30

''भविष्यात कामगिरीत आणखीन सुधारणा करून ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे.''

Latur's Dnyaneswari Shinde did the maximum in London! Won Silver Medal in Commonwealth Fencing Team Group | ज्ञानेश्वरीने लंडनमध्ये केली कमाल! राष्ट्रकुलमध्ये तलवारबाजी सांघिक गटात पटकावले राैप्यपदक

ज्ञानेश्वरीने लंडनमध्ये केली कमाल! राष्ट्रकुलमध्ये तलवारबाजी सांघिक गटात पटकावले राैप्यपदक

googlenewsNext

- महेश पाळणे 
लातूर :
आक्रमक खेळ व उत्कृष्ट पॅरी अटॅकचे काैशल्य असलेल्या लातूरच्या ज्ञानेश्वरी शिंदेनी लंडन येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत ज्युनिअर गटात आपल्या खेळाची लय कायम राखत भारताला सांघिक गटात राैप्यपदक मिळवून दिले.

हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ज्ञानेश्वरी माधव शिंदेने इप्पी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत लंडन येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत छाप साेडली आहे. तिची सलग ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून, या स्पर्धेत तिने आपले काैशल्य पणाला लावून भारताला हे यश मिळवून दिले आहे. लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत संघाने अनेक देशांचा पराभव केला. पहिल्या आठ देशांच्या झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४५-४० असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मात्र यजमान इंग्लंड संघाकडून भारताला ४५-२५ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे राैप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तिला प्रशिक्षक वजिराेद्दीन काझी, माेहसीन शेख, आकाश बनसाेडे, बबलू पठाण, राेहित गलाले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे राज्य संघटनेचे अध्यक्ष सतीश बंटी पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. अभिजित माेरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गलाले, क्रीडा संचालक सुधीर माेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी काैतुक केले.

क्रीडाक्षेत्राने दिला मदतीचा हात...
राष्ट्रकुल स्पर्धेत केंद्राच्या क्रीडा विभागाने केवळ पाच खेळाडूंचा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली हाेती. यामुळे ज्ञानेश्वरीचे राष्ट्रकुल स्पर्धेचे स्वप्न भंगते की काय, असे वाटत हाेते. मात्र, लातूरच्या क्रीडा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक लाखाचा निधी तिला उपलब्ध करून दिला. यासह जिल्हा संघटनेनेही तिला ६१ हजारांची मदत केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिचा मार्ग सुकर झाला हाेता. त्यातच तिने आता पदक जिंकल्याने ही मदत सार्थ ठरली.

ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय...
राष्ट्रकुल स्पर्धेत राैप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे. भविष्यात कामगिरीत आणखीन सुधारणा करून ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे.
 - ज्ञानेश्वरी शिंदे, लातूर

Web Title: Latur's Dnyaneswari Shinde did the maximum in London! Won Silver Medal in Commonwealth Fencing Team Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.