लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड नवीन लोहमार्ग थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:07+5:302021-02-06T04:34:07+5:30
उदगीर : यंदाच्या अर्थसंकल्पात बिदर-नांदेड व्हाया औराद, देगलूर नवीन प्रस्तावित लोहमार्गास निधी मिळाला नाही. याशिवाय, लातूर रोड- अहमदपूर-लोहा-नांदेड नवीन ...

लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड नवीन लोहमार्ग थंड बस्त्यात
उदगीर : यंदाच्या अर्थसंकल्पात बिदर-नांदेड व्हाया औराद, देगलूर नवीन प्रस्तावित लोहमार्गास निधी मिळाला नाही. याशिवाय, लातूर रोड- अहमदपूर-लोहा-नांदेड नवीन लोहमार्ग थंड बस्त्यात टाकण्यात आला आहे. लातुरातील कोच फॅक्टरीसाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
यासंदर्भात उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे म्हणाले, मराठवाड्यात दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वे असे दोन विभाग येतात. यातील लातूर अर्धा जिल्हा आणि उस्मानाबाद संपूर्ण जिल्हा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाशी निगडित आहे. उर्वरित मराठवाडा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड व सिकंदराबाद विभागात येतो. मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या लातूर जिल्हा व संलग्न जिल्ह्याला प्राप्त निधीमध्ये सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद नवीन लोहमार्गास २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुर्डूवाडी ते लातूर रोड लोहमार्गावर विद्युतीकरणासाठी ४५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय लातूर येथील कोच फॅक्टरीसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. लातूर रेल्वे स्थानकात रेल्वेत वापरासाठी पाणी भरण्याकरिता अद्ययावत तंत्रज्ञान प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, लातूर येथे पीट लाईन मंजुरी असतानाही निधीबाबत उदासीनता दर्शविण्यात आली आहे.
लातूर रोड- जळकोट- मुखेड- बोधन नवी प्रस्तावित लोहमार्गास मान्यता मिळाली नाही. एकंदरित रेल्वे बोर्डाने विद्युतीकरण, मालवाहतूक, सुरक्षा यंत्रणा व आधुनिक तंत्रज्ञानावर खर्च करण्यास भर दिला आहे.
मराठवाड्याला मिळाला असा निधी...
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विकाराबाद-परळी लोहमार्गावर विद्युतीकरणासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परळी-बीड-नगर लोहमार्गासाठी ५२७ कोटी ६३ लाख ८८ हजारांचा निधी, अकोला-पूर्णा-मुदखेड दुहेरीकरणासाठी पाच कोटी रुपये, नांदेड-यवतमाळ-वर्धा नवीन लोहमार्गासाठी ३४७ कोटी १ लाख ४४ हजारांचा निधी देण्यात आला आहे.