- संदीप अंकलकोटेचाकूर (लातूर): चाकूर तालुक्यातील कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने थेट सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाटील यांनी तातडीने कृषी कार्यालयाला भेट देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या केळी पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून कृषी कार्यालयाच्या चकरा मारल्या होत्या. मात्र, त्यांची दखल घेतली जात नव्हती. गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता तो पुन्हा कार्यालयात गेला असता, संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने तो संतप्त झाला. त्याने थेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.
मंत्री ३६ पायऱ्या चढून पोहोचले कार्यालयातशेतकऱ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार मंत्री पाटील यांनी तात्काळ चाकूर कृषी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असतानाही, कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या तब्बल ३६ पायऱ्या चढून ते कार्यालयात दाखल झाले. मंत्री कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कार्यालयातील एकूण १० कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ कर्मचारी हजर होते. इतर अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते आणि जे हजर होते तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते.
कारवाईचे थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणेपाटील यांनी तात्काळ जिल्हा कृषी अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाईल बंद होता. अखेर, त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून कार्यालयातील समस्यांबाबत माहिती दिली आणि गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे सक्तीचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाहीया भेटीदरम्यान, एका शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ३६ पायऱ्या चढणे किती कठीण आहे, हे स्वतः अनुभवल्याने पाटील यांनी कार्यालय तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.