धक्कादायक! लातूर महापालिका आयुक्तांनी स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली; उपचार सुरू

By धर्मराज हल्लाळे | Updated: April 6, 2025 08:17 IST2025-04-06T08:17:08+5:302025-04-06T08:17:33+5:30

शनिवारी रात्री ११.१५ची घटना, घरात पत्नी आणि दोन्ही लहान मुले होती

Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare shot himself in the head; condition stable, treatment underway | धक्कादायक! लातूर महापालिका आयुक्तांनी स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली; उपचार सुरू

धक्कादायक! लातूर महापालिका आयुक्तांनी स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली; उपचार सुरू

लातूर: महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. ही घटना बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी घडली. त्यावेळी सुरक्षारक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमके काय घडले, आणि त्यांनी डोक्यात गोळी झाडून का घेतली, याचा पोलिस तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वत:च डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून येत आहे, असे पोलिस म्हणाले. आयुक्त मनोहरे यांनी २० ऑक्टाेबर २०२२ रोजी लातूर महापालिकेत पदभार स्विकारला होता. आयुक्त आणि प्रशासक असल्याने संपूर्ण कारभार तेच पाहत होते. नुकताच २७ मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला. शनिवारी सुटी असल्याने ते घरीच होते.

मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत नाही!

आयुक्त मनोहरे यांना तातडीने सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. हणमंत किनीकर म्हणाले, उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी आत जावून डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे. प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत झालेली नाही. त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी गेली आहे. उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे, असे डॉ. किनीकर म्हणाले.

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्याकडून विचारपूस

घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली. यादरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुंडे, महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी रूग्णालयात पोहोचले होते. घटना ११.१५ वाजता घडली. त्यानंतर अगदी कमी वेळात कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना रूग्णालयात आणल्याने तत्पर उपचार सुरू झाले.

घटनेच्या वेळी दरवाजा बंद

आयुक्त मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडली होती, त्यावेळी त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रूग्णालयात आणले. आयुक्त मनोहरे यांच्या कामाची शैली माहित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले. हा प्रकार घडला त्यावेळी निवासस्थानी पत्नी आणि दोन्ही लहान मुले होती.

Web Title: Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare shot himself in the head; condition stable, treatment underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर