तेलंगणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूरचा फौजफाटा
By आशपाक पठाण | Updated: November 27, 2023 18:35 IST2023-11-27T18:34:24+5:302023-11-27T18:35:27+5:30
लातूरचे ५०० होमगार्ड सोमवारी रवाना.निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूर येथून सुरक्षारक्षक पाठविण्यात आले आहे.

तेलंगणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूरचा फौजफाटा
लातूर : तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूर येथून सुरक्षारक्षक पाठविण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेलंगणातून आलेल्या जवळपास दहा बसेसमधून ५०० होमगार्ड रवाना झाले आहेत.
लातूर पोलिस दलाकडून तेलंगणा राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्त पाठविण्यात आला आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सकाळपासून होमगार्डची लगबग सुरू होती. बॅगा आवरून कोण कोणत्या गाडीत बसणार, यासाठी वरिष्ठांकडून नियोजन केले जात आहे. दुपारनंतर रवाना झालेले हे सुरक्षारक्षक तेलंगणा राज्यात पाच दिवस बंदोबस्तावर राहणार आहेत. त्यानंतर तेलंगणा सरकारकडून संबंधितांना पुन्हा लातूरला आणून सोडले जाईल, असे सांगण्यात आले.
तेलंगणाच्या बसेस दाखल...
तेलंगणा सरकारच्या जवळपास ८ ते १० बसेस अचानक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात येऊन थांबल्या. अचानक एवढ्या बसेस कशा आल्या, याची उत्सुकता अनेकांना लागली होती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेकांनी जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी आपल्याकडील होमगार्ड बसमध्ये आपापले सामान ठेवण्याची धावपळ करीत असल्याचे दिसून आले.