राजकुमार जोंधळे, लातूर: औसा तालुक्यातील बोपला येथील सख्ख्या भावाच्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासांत करून आराेपी भावाला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तर, अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, १४ मे रोजी गुन्ह्यातील मयत दयानंद भगवान काटे (वय ५५, रा. बोपला, ता. औसा) याचा अज्ञातांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत मयताच्या मुलाच्या तक्रारीवरुन लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून तपासाला सुरुवात केली.
या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी सूचना केल्या. दरम्यान, दयानंद काटे यांच्या मारेकऱ्याचा शोध घेतला असता, लहान सख्खा भाऊ देवानंद भगवान काटे (वय ४३, रा. बोपला) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला राहत्या ठिकाणावरून १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. अधिक चौकशी केली असता, त्याने अल्पवयीन मुलाला साेबत घेत शेतीच्या बांधावरील भांडणाचा राग मनात धरून मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, अर्जुन राजपूत, युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, रियाज सौदागर, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.