किनगाव (जि. लातूर) : दुचाकीवरून पडल्याने बापाचा मृत्यू झाल्याची घटना खलंग्री (ता. रेणापूर) येथे घडली. याबाबत दुचाकी चालविणाऱ्या मुलाविरोधात हायगय व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील रहिवासी बालाजी विश्वंभर शिंदे (वय ४५) हे आपला मुलगा शुभम चालवित असलेल्या दुचाकीवरून (एमएच २४-सीबी १५८८) बुधवारी (दि. ६ ऑगस्ट २०२५) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत हाेते. दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेले वडील बालाजी शिंदे हे ताेल गेल्याने खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान ९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत ऋषीकेश बालाजी शिंदे (वय २१, रा. खलंग्री, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनगाव पोलिस ठाण्यात शुभम बालाजी शिंदे (वय २४) याच्याविराेधात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास किनगाव पोलिस करीत आहेत.