लालपरीतील अग्निशमन यंत्र गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST2021-03-05T04:19:49+5:302021-03-05T04:19:49+5:30

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर बसस्थानकातून धावणाऱ्या अनेक प्रवासी बसेसमध्ये ना अग्निशमन यंत्रणा ना प्रथमोपचार पेट्या, अशी ...

Lalpari fire extinguisher disappears! | लालपरीतील अग्निशमन यंत्र गायब !

लालपरीतील अग्निशमन यंत्र गायब !

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर बसस्थानकातून धावणाऱ्या अनेक प्रवासी बसेसमध्ये ना अग्निशमन यंत्रणा ना प्रथमोपचार पेट्या, अशी अवस्था आहे. शिवाय, बसमध्ये स्वच्छतेचाही अभाव आहे. प्रवासी सीट आणि चालकाच्या कॅबीनची दुरवस्था असल्याचे अनेक बसमध्ये पहायला मिळाले.

‘लोकमत चमू’ने गुरुवारी दुपारी १२.३० ते २ या वेळेत मध्यवर्ती बसस्थानकात सात ते दहा बसेसमध्ये जाऊन स्थिती पाहिली. यात सात बसेसमध्ये नळकांड्या, प्रथमोपचार पेट्या दिसल्याही नाहीत. एक-दोन बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या होत्या, परंतु त्याही रिकाम्या. अंतर्गत स्वच्छतेचाही अभाव होता.

या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही

लातूर-उस्मानाबाद (एमएच १४ बीटी २५२८)

लातूर-सोलापूर (एमएच २४ बीएल २५४७)

लातूर-नांदेड (एमएच २० बीएल ४०१७)

शिंगणापूर-मुखेड (एमएच १३ सीयू १९०५)

प्रथमोपचार पेट्याही गायब

अग्निशमन यंत्र आणि प्रथमोपचार पेट्या प्रत्येक बसेससाठी अनिवार्य असतात. मात्र लातूर बसस्थानकातून धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा आणि प्रथमोपचार पेट्या दिसल्या नाहीत. पेट्याही गायब आणि अग्निशमन यंत्रही गायब, अशी अवस्था अनेक बसेसमध्ये दिसून आली. काही बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या होत्या. मात्र सदर बाॅक्स औषधांविना रिकामेच होते. याकडे मंडळाचे दुर्लक्ष आहे.

वायफाय सुविधा नावालाच

वायफाय सुविधा देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केली होती. मात्र या योजनेचाही बोजवारा उडाला असून, वायफायचे नुसतेच डबे शोभेची वस्तू म्हणून बसेसमध्ये दिसत आहेत. प्रारंभी काही काळ वायफाय सुविधा महामंडळाने पुरविली असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून ही सुविधा बंदच आहे. प्रवाशांना सुविधा पुरविण्यात महामंडळाला अपयश दिसते.

एसटीची आतून दुरवस्था

बसस्थानकांमध्ये चमूने अनेक बसेसमध्ये जाऊन आतील अवस्था पाहिली असता बसेसची भंगारगत अवस्था दिसून आली. स्वच्छतेचाही अभाव होता. अनेक बसमधील प्रवासी सीट खराब झालेले आहेत. काही सीटवरील कपडा फाटलेला असून, काही सीटही तुटलेले आहेत. याकडे महामंडळ प्रशासनाचे बहुधा दुर्लक्ष असावे.

अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. प्रथमोपचार पेट्याही आहेत. त्यात नियमानुसार औषधी व काही अघटित घडल्यास मुकाबला करण्याची सोय आहे. काही बसेसमध्ये अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेट्या नसतील तर त्याची तपासणी करून पेट्या बसविल्या जातील. अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येईल. वायफाय सुविधेचे मात्र संबंधित कंपनीकडील कंत्राट संपले आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

Web Title: Lalpari fire extinguisher disappears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.