स्थानकात स्वच्छतागृहाचा अभाव, महिला प्रवाशांची होतेय कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:25+5:302021-08-28T04:24:25+5:30
निलंगा : निलंगा येथे नवीन बसस्थानक बांधण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांसाठी अद्यापही स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले नसल्याने मोठी अडचण ...

स्थानकात स्वच्छतागृहाचा अभाव, महिला प्रवाशांची होतेय कुचंबणा
निलंगा : निलंगा येथे नवीन बसस्थानक बांधण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांसाठी अद्यापही स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी, पुरुष प्रवासी भिंतीच्या आडोशाचा आधार घेत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. एसटी आगाराचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेनजीक निलंगा तालुका आहे. येथील बसस्थानकातून महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील बसेस धावत असतात. त्यामुळे सतत येथे रेलचेल असते. तसेच परिसरातील खेड्यापाड्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करीत असतात. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक, व्यापारी विविध कामांनिमित्ताने येथे सतत ये-जा करतात. त्यामुळे स्थानकात नेहमी वर्दळ असल्याचे पाहावयास मिळत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाने येथील प्रवासी वाहतूक पाहून बसस्थानक बांधले होते. त्यात आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी स्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने आणि प्रवासी संख्या वाढल्याने बसस्थानकासाठी नवीन इमारत बांधकाम सुरू झाले. त्यामुळे जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले. तीन वर्षांपासून स्थानकाचे काम सुरू आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे बांधकाम बंद होते. आता निधीअभावी बांधकाम ठप्प झाले आहे. सध्या नवीन इमारतीत प्रवाशांसाठी स्वच्छतागृह नाही. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
नैसर्गिक विधीसाठी पुरुष प्रवासी स्थानकानजीकच्या भिंतीचा आडोसा घेतात. परंतु, महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर लघुशंका उरकल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्याचा स्थानकातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकात स्वच्छतागृह निर्माण करण्यात यावे आणि गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.
तात्पुरत्या स्वच्छतागृहासाठी पालिकेस पत्र...
निधीअभावी स्थानकाचे काम बंद झाले आहे. त्यामुळे निधीची गरज आहे. तसेच तात्पुरते स्वच्छतागृह निर्माण करण्यासाठी गेल्या महिन्यात पालिकेकडे पत्र देऊन मागणी केली आहे. परंतु, अद्यापही पालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगाराकडून एका कोपऱ्यात पत्र्याचे शेड उभारून तात्पुरते शौचालय तयार करण्यात आले आहे. परंतु, प्रवासी त्याचा उपयोग करीत नाहीत.
- युवराज थडकर, आगारप्रमुख, निलंगा