बेलकुंड : कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतीने ग्रामसभा स्थगित करावे असे आदेश १२ मे २०२० रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले होते. या निर्णयाला एक वर्ष झाले असून अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वर्षभरापासून न झाल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. .
शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे परंतु कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होत असते. ही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आलेले नाही. रोजगार हमीचा आराखडा मासिक बैठकीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. पण ही ग्रामसभा झालीच नाही. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत पंधराव्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो. विकास कामांचा प्राधान्यक्रम करून सुधारित आराखडा मंजूर केला जातो. परंतु ही ग्रामसभा सुद्धा होऊ शकली नाही. २६ जानेवारीला ग्रामसभा होईल असे वाटले होते मात्र ती रखडली आहे. गत वर्षभरात परिसरातील बेलकुंड, उजनी, टाका, मासुर्डी, तुंगी यासह जवळपास ८ गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले व नव कारभारी सत्तेवर आले पण अजून एकही ग्रामसभा झाली नसल्याचे चित्र आहे.