निधीअभावी घरकुलांच्या कामांना गती येईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:35+5:302021-08-24T04:24:35+5:30
लातूर: महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री घरकूल योजनेत ४०५६ घरकूल मंजूर झाले आहेत. त्यापैकी ३७११ घरकुलांसाठी केंद्र व राज्य ...

निधीअभावी घरकुलांच्या कामांना गती येईना!
लातूर: महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री घरकूल योजनेत ४०५६ घरकूल मंजूर झाले आहेत. त्यापैकी ३७११ घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून ५१ कोटी २२ लाख १९ हजारांचा पहिला व दुसरा टप्पा प्राप्त झाला आहे. आणखी ५४ कोटींच्या निधीची प्रतीक्षा आहे. निधी वेळेत प्राप्त होत नसल्याने घरकुलांची कामे रेंगाळले आहेत. मंजूर घरकुलांपैकी ३४५ घरकुलांचा पहिला व दुसरा टप्पा अद्याप प्राप्त होऊ शकला नाही.
घरकूल योजनेत राज्य शासनाचा एक लाख आणि केंद्र शासनाचा दीड लाख प्रती घरकूल हिस्सा आहे. ज्यांना स्वतःची जागा आहे, परंतु छताचे घर नाही, अशांना घरकूल देण्याची ही योजना आहे. त्यानुसार महानगरपालिकेकडे आलेल्या प्रस्तावातून ४०५६ घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३७११ घरकुलांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ५१ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यातील केंद्र शासनाकडून १९ कोटी ५७ लाख प्राप्त झाले आहेत. तर राज्य शासनाकडून ३१ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानुसार ३७११घरकुलांना हा निधी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान,३ हजार ७११ घरकुलांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून १०५ कोटी रुपयांचा निधी येणे अपेक्षित होते. परंतु ५१ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर आणि मागणीच्या प्रमाणात निधी वेळेत मिळत नसल्याने घरकुलांची कामे संथ गतीने होत आहेत.
दीडशे ते दोनशे घरकुलांची कामे पूर्ण...
या योजनेत दीडशे ते दोनशे घरकुलांची लातूर शहरात कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने अकराशे घरकुलांच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. पूर्वी मंजूर असलेल्या घरकुलांचा फक्त पहिला आणि दुसरा टप्प्यातील निधी मिळाला. तो ही अपूर्ण मिळाला आहे. त्यामुळे नव्याने वर्क ऑर्डर दिलेल्या घरकुलांना निधी कधी मिळेल, असा प्रश्न आहे.
३४५ घरकुलांना पहिल्या, दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा
४०५६ घरकूल यांपैकी ३७११ घरकुलांचा अपूर्ण निधी मिळालेला आहे. तर ३४५ घरकुलांना पहिला आणि दुसरा टप्पा आला नाही. त्यामुळे कामे खोळंबली असल्याचे अनेक लाभार्थ्यांनी सांगितले. एकूण पाच टप्प्यात पैसे देण्यात येत असल्याने घरकूल तयार होण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी जात असल्याचेही लाभार्थ्यांनी सांगितले.