उदगीरच्या प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:46+5:302021-04-06T04:18:46+5:30
उदगीर शहर आणि परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असून, केवळ पंधरा दिवसात या भागामध्ये पाचशेपेक्षा जास्त कोरणा ...

उदगीरच्या प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव !
उदगीर शहर आणि परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असून, केवळ पंधरा दिवसात या भागामध्ये पाचशेपेक्षा जास्त कोरणा बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. उदगीरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी नागरिकांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उदगीर येथील आरोग्य विभागाने केले आहे. त्याचबराेबर नगरपालिकेने सर्व व्यापाऱ्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक केल्याने तपासणी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तपासणीसाठी उदगीर शहरात सामान्य रुग्णालयाच्या वतीने दोन ठिकाणी अँटीजन तपासणीचे केंद्र तर आरटीपीसीआर तपासणीसाठी जुने शासकीय विश्रामगृह येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे. परिणामी, या ठिकाणी तपासणीसाठी एकच गर्दी होत आहे. रुग्णाची नोंद घेणे आणि रुग्ण तपासणीचे काम हे केवळ दोन कर्मचाऱ्यांवर सध्याला सुुरु आहे. सकाळच्या सत्रात जागृती थिएटरमध्ये अँटीजन तपासणी करणारे दोन कर्मचारी दुपारी, पुन्हा जुने शासकीय विश्रामगृह येथे येऊन आरटीपीसीआर तपासणी करत आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने येथे गर्दी होत आहे. वास्तविकपणे शहरात नगरपालिका, तालुका आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालयात अंतर्गत येणारे कोविड रुग्णालयाचे कर्मचारी मिळून संयुक्त पथकाद्वारे तपासणी करण्याचे नियोजन असताना नगरपालिका प्रशासन, तालुका आरोग्य विभाग या मोहिमेपासून दूरच असल्याचे सोमवारी आढळून आले. जमलेली गर्दी पाहून काही रुग्ण परत जात होते. ही बाब उदगीर येथील रुग्णालयाचे प्रमुख डॉ. शशीकांत देशपांडे यांना समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब सूचना देऊन कुठलाही रुग्ण विना तपासणीशिवाय परत न जाण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.
एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ कर्मचारी उपलब्ध आहे. तो कर्मचारी आम्ही तपासणीसाठी उपलब्ध करून दिला आहे. इतर कामासाठी कमी पडणारा कर्मचारीवर्ग शिक्षण विभागाकडून मदतीसाठी घेतलेला असल्याचे तालुका आराेग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे म्हणाले.
नगरपालिकेचे सहकार्य मिळत नाही...
तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद घेणे आणि तपासणी करणे हे काम सध्या कोवीड रुग्णालयाच्या वतीने सुरु आहे. मात्र, अशा काळात नगरपालिका सहकार्य करत नाही. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. सकाळच्या सत्रात जागृती थिएटरमध्ये अँटीजन तपासणी करणे आणि दुपारच्या सत्रात जुने शासकीय विश्रामगृह येथे आरटीपीसीआर तपासणी त्याच कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे काहीवेळा नागरिकांची गैरसोय होत आहे. असे नाेडल अधिकारी डाॅ. शशीकांत देशपांडे म्हणाले.