मृग बरसल्याने कुळव, तिफण दुरुस्ती सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:48+5:302021-06-18T04:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क येरोळ : यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. त्यामुळे येरोळ व परिसरातील शेतकरी ...

मृग बरसल्याने कुळव, तिफण दुरुस्ती सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
येरोळ : यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. त्यामुळे येरोळ व परिसरातील शेतकरी खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेले लाकडी कुळव, तिफण या अवजारांच्या दुरुस्तीसाठी पारंपरिक सुतार व लोहार काम करणाऱ्यांकडे गर्दी करत आहेत.
हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला आहे. दरम्यान, मृगाचा पाऊस सतत होत असल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर रेलचेल वाढली आहे. दरम्यान, पेरणीसाठी आवश्यक असलेली लाकडी शेती अवजारे तयार करुन घेणे तसेच दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. सध्या शेतकरी सुतार व लोहार यांच्या दुकानासमोर थांबून तिफण भरुन घेणे, कुळवाला नवीन लाकडी दांडी बसवून घेणे, तिफणीला लाकडी फन बसवून घेण्यासाठी धावपळ करत आहेत. पूर्वी बैलजोडीवर अवलंबून असलेली शेती आता ट्रॅक्टरच्या यंत्राच्या साह्याने केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी बैलजोडीच्या साह्याने चाढ्यावर मूठ धरत आहेत. सध्या शेतकरी खरिपाची तयारी करत असून, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांना मागणी वाढली आहे. मोठे शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देत असल्याने व लाॅकडाऊन उठल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे.
यंत्रामुळे व्यवसायावर परिणाम...
सध्या बहुंताश शेतकरी यंत्राच्या साह्याने शेती करत आहेत. त्यामुळे लाकडी अवजारांची मागणी घटली आहे. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी लाकडी अवजारांच्या दुरुस्तीसाठी येत आहेत. त्यावरच कुटुंबाचा उदनिर्वाह होत आहे. यंत्रामुळे आमच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पांढरवाडी येथील कारागीर अंकुश बनसोडे यांनी सांगितले.
सर्जा-राजाच्या जीवावर शेती...
बहुतांश शेतकऱ्यांना बैलजोडीच्या साह्याने शेती करणे परवडेनासे झाले आहे. तसेच सध्याच्या तरुणांना पूर्वीच्या शेतकऱ्यांसारखे कष्ट होत नाहीत. त्यामुळे यंत्राच्या साह्याने शेती केली जात आहे. मात्र, आम्ही अनुभवी शेतकरी सर्जा-राजाच्या जीवावर शेती करत आहोत, असे आटोळा येथील शेतकरी बापूराव लोहारे यांनी सांगितले.