पोलीस दलातील ९० टक्क्यांवर कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:42+5:302021-03-16T04:20:42+5:30
लातूर जिल्हा पोलीस दलात एकूण १ हजार ८८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्याशिवाय, ६०० होमगार्डस् विविध पोलीस ठाण्यांमध्ये ...

पोलीस दलातील ९० टक्क्यांवर कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड लस
लातूर जिल्हा पोलीस दलात एकूण १ हजार ८८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्याशिवाय, ६०० होमगार्डस् विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. २३ मार्च २०२० पासून हे कर्मचारी जिल्हाभरात ठिकठिकाणी बंदोबस्तावर आहेत. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर वाहन तपासणी, नाकाबंदी आणि बंदोबस्त त्यांच्या वाट्याला आला होता. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधाही झाली होती. आता या कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली जात आहे. एकूण ९९ अधिकारी व १ हजार ५२९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांना दिली जाणार कोविडची लस...
लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण ११५ अधिकारी आणि १ हजार ७७४ असे एकूण १ हजार ८८९ जणांना लस देण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ६२८ जणांना लस देण्यात आली आहे. आता येत्या दोन दिवसांत उर्वरित कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांचा टक्का ९० च्या वर आहे. केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिले आहे. यामध्ये मधुमेह, ब्लडप्रेशर आणि इतर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या कर्मचाऱ्यांना येत्या दोन दिवसांत लस दिली जाणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.