कोल्हापुरी, सिमेंट बंधा-यांना मंजुरी, जळकोटात सिंचन क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:51+5:302021-03-13T04:35:51+5:30
जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने ...

कोल्हापुरी, सिमेंट बंधा-यांना मंजुरी, जळकोटात सिंचन क्षेत्र वाढणार
जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने पाच कोटी ५४ लाख मंजूर केले आहेत. त्यातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधा-यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जळकोट तालुका हा पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी केवळ खरीप हंगाम घेतात. तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असल्याने शेती उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर सिंचनाच्या सुविधाही कमी प्रमाणात आहेत. तालुक्यातील शेतक-यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शेती उत्पादन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सिंचनाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीतून कोल्हापुरी आणि सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. जळकोटात एक कोटी ४२ लाख, तिरुका येथे एक कोटी ३२ लाख, डोंगरकोनाळीत एक कोटी ३७ लाख, उमरगा येथे एक कोटी ४३ लाख रुपये खर्चून सदरील कामे होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील या चार गावांतील शेतक-यांतून आनंद व्यक्त होत आहे. या कामामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होऊन तो जमिनीत मुरणार आहे. त्याचा विहिरी, कूपनलिकांना लाभ होणार आहे.
हा निधी मंजूर झाल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील-आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील-दळवे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे, धनंजय भ्रमण्णा, श्याम डांगे, गोविंद ीभ्रमण्णा, दस्तगीर शेख, आकाश वाघमारे आदींनी आनंद व्यक्त केला आहे.
लवकरच टेंडर प्रक्रिया होणार...
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, तालुक्यातील चार गावांतील सिंचनात वाढ व्हावी आणि शेतक-यांची प्रगती व्हावी म्हणून कोल्हापुरी व सिमेंट बंधारा कामासाठी जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याची लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. ती झाल्यानंतर कामास सुरुवात होईल.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार...
तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही संपुष्टात येणार आहे. या बंधा-यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याचा शेतक-यांसह सामान्यांना लाभ होणार आहे.